शिवसेनेच्या फरारी जिल्हा परिषद सदस्याला अटक, पांगरमल दारुकांड प्रकरणातील मुख्य आरोपी; काय आहे प्रकरण?

जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांसाठी आयोजित दारु पार्टीत दारू पिलेल्या तब्बल ९ जणांचा मृत्यु होऊन राज्यभरात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारुकांड प्रकरणातील मुख्य आरोपी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री गोविंद मोकाटे यांना राज्य गुन्वेषण विभागाने अटक केली.

  पुणे : जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांसाठी आयोजित दारु पार्टीत दारू पिलेल्या तब्बल ९ जणांचा मृत्यु होऊन राज्यभरात गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारुकांड प्रकरणातील मुख्य आरोपी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री गोविंद मोकाटे यांना राज्य गुन्वेषण विभागाने अटक केली. गेल्या ६ वर्षांपासून त्या फरार होत्या. विशेष म्हणजे फरार काळात त्यांनी म्हाळुंगे येथील एका नामांकित कंपनीत त्या सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून कामाला होत्या. अहमदनगरमध्ये ही घटना २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत घडली होती.

  अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपूरे, पोलीस अधीक्षक पल्लवी बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवालदार विकास कोळी, सुनिल फकिरप्पा बनसोडे, उज्वला डिंबळे, पोलीस नाईक कदम यांनी ही कामगिरी केली.

  या गुन्ह्यातील २० पैकी १७ आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर, दोघे मृत्यु पावले आहेत. यातील मुख्य आरोपी भाग्यश्री गोविंद मोकाटे (रा. इमामपूर, ता. जि. अहमदनगर) ही जिल्हा परिषद जेऊर गटातून २०१७ मध्ये जि. प. सदस्य म्हणून निवडुन देखील आली. परंतु, त्या मागील ६ वर्षांपासून फरार होत्या. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता. त्यांच्याविरुद्ध पकड वॉरट व जाहीरनामे प्रसिद्ध करुनही त्या शरण आल्या नव्हत्या. याप्रकरणात २० आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  सापळा रचून केली अटक

  भाग्यश्री मोकाटे या पुणे शहरात रहात आहेत. त्या म्हाळुंगे येथील नामांकित कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करत असल्याची माहिती सीआयडीला मिळाली. त्यानुसार सापळा रचून पकडण्यात आले.

  काय आहे प्रकरण? 

  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकरीता भाग्यश्री गोविंद मोकाटे या जिल्हा परिषद व मंगल महादेव आव्हाड या पंचायत समितीच्या निवडणुकीकरीता शिवसेनेच्या उमदेवार होत्या. १२ फेबु्वारी २०१७ रोजी मतदारांना व कार्यकर्त्यांना जेवण व देशी, विदेशी दारु पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत दारु पिल्याने एकूण ९ जणांचा मृत्यु झाला होता, तर, १३ जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांना अर्धांग वायू व एकास अंधत्व आले आहे.