गडब डोलवी औद्योगिक भूसंपदान मोजणी; शेतकऱ्यांचा विरोध कायम

भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून कोलवे या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र जमून या मोजणीला विरोध केला.

    पेण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव-गडब, डोलवी, वडखळ बोरी ग्रामपंचायत  परिसरातील बेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमाचेळा, खारघाट या गावातील जमीन संपादित करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून कोलवे या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र जमून या मोजणीला विरोध केला. या वेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पेण पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, निलेश म्हात्रे, विजय पाटील, सुशील कोठेकर, राजू पाटील, महेश पाटील, महेंद्र कोठेकर, गजानन पेढवी, प्रवीण म्हात्रे, प्रभाकर पाटील आदीसह शेतकरी, महिला, शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
    या प्रकल्पातील खारजांभेळा, खारचिर्बी, खारढोंबी या गावातील जमीनी शासनाने भुसंपादनातुन वगळण्याचा निर्णय घेतला असला तरी  कोलवे, बेणेघाट, वावे,डोलवी, काराव, खारमांचेळा, खारकारावी या गावातील जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार असल्याने या संर्भातील जमीन मोजणी सदर्भातील नोटीस  येथील शेतकऱ्यांना देण्यात आली. या नोटिसी शेतकऱ्यांनी स्वीकारल्या नाहीत, तर कोलवे येथे येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी एकत्र जमून या मोजणीस विरोध केला. ज्याप्रमाणे तीन गावे वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला त्याचप्रमाणे या प्रकल्पातील सर्व गावे भूसंपादनातून वगळून  हा प्रकल्पच शासनाने रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

    अनेकांचे रोजगार बुडणार

    या भूसंपादनामुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन नष्ट होणार आहे. गावाचा विस्तार करण्यासाठी जागाच शिल्लक राहाणार नाही. तर  अनेकांचे छोटे मोठे व्यवसाय या जागेत आसल्याने अनेकांचा रोजगार जाणार आहे. त्यामुळे या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. हे भूसंपादन रद्द करावे अशा हरकती उपविभागीय अधिकारी कार्यालय पेण येथे शेतकऱ्यांनी नोंदविल्या आहेत. शेतकरी आक्रमक झाले आसल्याने शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पाहता मोजणीचे अधिकारी कोलवे  या ठिकाणी आलेच नाहीत.