Gajanan Wankhede's successful experiment with broccoli

शिरपूरपासून जवळच असलेल्या गौळखेडा येथील प्रयोगशील शेतकरी गजानन तुळशीराम वानखेडे यांच्याकडील दोन एकर शेतातील केवळ दहा गुंठ्यात त्यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानातून पॉलिहाऊस बनवले. सध्या पॉलिहाऊस मधील दहा गुंठे क्षेत्रात पुणे येथील रिजवान कंपनीकडून ब्रोकोली  ( Broccoli )  हे विदेशी (इटली येथील) या जातीचे बियाणे आणून त्याची लागवड केली.

  शिरपूर : येथून जवळच असलेल्या गौळखेडा येथील गजानन वानखेडे या तरुण शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील केवळ दहा गुंठे क्षेत्रात ब्रोकोली  ( Broccoli ) हे विदेशी भाजीपाला पीक घेत नवा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. ब्रोकोली पिकामुळे आर्थिक बाबतीत त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने या पिकाचे उत्पादन त्यांनी घेतले असून या पासून त्यांना दोन लाखाचे उत्पादन अपेक्षित आहे.

  शिरपूर व परिसर हा विविध भाजीपाला पिके घेण्यात अग्रेसर आहे. या परिसरात प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. असेच शिरपूरपासून जवळच असलेल्या गौळखेडा येथील प्रयोगशील शेतकरी गजानन तुळशीराम वानखेडे यांच्याकडील दोन एकर शेतातील केवळ दहा गुंठ्यात त्यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानातून पॉलिहाऊस बनवले. त्यात आतापर्यंत त्यांनी विविध प्रकारचे विक्रीसाठी रोपे वांगी, मिरची, टमाटर, कोबी, सिमला मिरची अशी आदी पिके चांगल्या प्रकारे घेतली. सध्या पॉलिहाऊस मधील दहा गुंठे क्षेत्रात पुणे येथील रिजवान कंपनीकडून ब्रोकोली  ( Broccoli )  हे विदेशी (इटली येथील) या जातीचे बियाणे आणून त्याची लागवड केली.

  दहा ग्रॅमचे पॉकेट १२०० रुपये प्रमाणे त्यांनी तीन पॉकेट खरेदी करत बियाणे पेरणीसाठी घेतले. सुरुवातीला त्याची रोपे तयार करून त्यांची रीतसर लागवड केली. साधारणतः ५५०० रोपांची लागवड त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी ग्रीन प्लॅनेट एस टी लिक्विड ड्रीपद्वारे दिले. त्यामुळे त्याची वाढ उत्तम झाली. सदर प्लॉटमध्ये दोन वेळा निंदन केले. त्यासाठी एक हजार रुपये खर्च त्यांना आला. सोबतच त्यासाठी २७०० रुपयाचे भूमी पावर खत दिले. जेके जैविक लिक्विड ड्रिपमधून सोडले त्यासाठी १६२० रुपये खर्च आला. तसेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी याचे  नियंत्रण करण्यासाठी त्यांनी फायटर नामक २ लिटर लिक्विड १७०० रुपयाचे दिले. फलधारणा सुव्यवस्थित व्हावी यासाठी किंग साईज ड्रीपमधून दिले. त्यासाठी १२०० रुपये खर्च त्यांना आला.

  सदर पिकासाठी सरासरी अंदाजे २० हजार रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. सेंद्रिय पद्धतीने ब्रोकोली हे पीक चांगल्या प्रकारे बहरले असून त्याची तोड देखील सध्या सुरू आहे. सदर ब्रोकोली ही भाजी पुणे, अकोला, अमरावती, वाशीम आदी ठिकाणी विक्रीसाठी पाठवितात. ब्रोकोलीची शेती ही जिल्ह्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले. सदर ब्रोकोलीची फळे साधारणतः दोनशे रुपये किलो या प्रमाणे विकल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या पिकापासून एकूण २ लाख रुपये उत्पन्न मिळेल, खर्च वजा जाता सरासरी दहा गुंठ्यात एक लाख ८० हजार रुपये निव्वळ नफा त्यांना मिळण्याची अपेक्षा आहे.

  कृषी विभागाचे मार्गदर्शन

  गजानन वानखेडे यांनी घेतलेल्या ब्रोकोली ( Broccoli ) या विदेशी भाजीच्या प्रयोगात्मक शेतीसाठी त्यांना कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रभारी तज्ञ अधिकारी कंकाळ, तालुका कृषी अधिकारी सावंत, पुणे येथील रुद्रायणी ऍग्रो इंडिया ग्रुपचे सुहास बळी, के. व्ही. के. करडा येथील भाजीपाला विभाग शास्त्रज्ञ प्रा. निवृत्ती पाटील, केव्हीकेचे कीटक तज्ञ प्रा. राजेश डवरे, करडा येथील केव्हीकेचे मत्स्य तज्ञ प्रा. काळे,मंडळ कृषी अधिकारी वाघ, पर्यवेक्षक देवानंद वानखेडे,कृषी सहाय्यक श्रीधर चवरे, ठाकरे कृषी सहाय्यक, कृषी सहाय्यक  शुभांगी राठोड यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या ब्रोकोली या भाजीपीक प्रयोगाबाबत त्यांचे कौतुक होत आहे. तर, त्यांच्या ब्रोकोलीला ( Broccoli ) चांगलीच मागणी असल्याचे दिसून येत आहे.