खातगुणमधील दर्ग्यात ‘गणपती बाप्पा मोरया’! पंचेचाळीस वर्षांपासून गणेशोत्सवातून हिंदू-मुस्लिम एकोप्याचा संदेश

सध्या नको त्या कारणाने दोन समाजात तेढ निर्माण करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोकांकडून जाणीवपूर्वक केला जातो आहे. मात्र सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या खातगुण (ता खटाव) येथील दर्ग्याच्या आवारातच गेल्या ४५ वर्षपासून विघ्नहर्ता गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला जात आहे.

  पुसेगाव : सध्या नको त्या कारणाने दोन समाजात तेढ निर्माण करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोकांकडून जाणीवपूर्वक केला जातो आहे. मात्र सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या खातगुण (ता खटाव) येथील दर्ग्याच्या आवारातच गेल्या ४५ वर्षपासून विघ्नहर्ता गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला जात आहे.

  खटाव तालुक्यातील खातगुण हे हिंदू-मुस्लीम समाजाची संस्कृती व सलोखा मिळून मिसळून जोपासणारे गाव. शिवाजी महाराजांच्या काळापासून म्हणजे सुमारे साडेतीनशे वर्षपासून यागावात असलेल्या पीरसाहेब राजेबागसार दर्ग्यातील कबरी चा मुस्लीम इतकाच हिंदू समाज ही मोठा भाविक वर्ग आहे. या दर्ग्यात नगऱ्यासह दररोज होणाऱ्या आरतीला हिंदू मुस्लिम समाज एकत्रित असतो. मुस्लिम समाजाचे विविध कार्यक्रम, हिंदूंचे कीर्तन, भजन सारखे कार्यक्रम ही याच दर्ग्यात हिंदू -मुस्लिम बांधव मिळून मिसळून साजरे करतात. यंदाही सुंदर सुबक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष ओंकार लावंड, अक्षय लावंड, प्रणव लावंड, शिवम जाधव, रशीद आतार, परवेझ आतार यांच्यासह अनेक हिंदू मुस्लिम कार्यकर्ते एकत्रितपणे दहा दिवस गणेशोत्सव साजरा करत आहेत. काही दिवसांपूर्वी या मंडळाचे अध्यक्ष अभिजित लावंड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने यंदा कोणताही कार्यक्रम साजरा न करता केवळ गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून परंपरा कायम ठेवली असल्याचे विद्यमान अध्यक्ष ओंकार लावंड यांनी सांगितले.

   विविध सांस्कृतिक कार्यक्रम
  गेल्या ४५ वर्षांपासून याच दर्ग्याच्या आवारात श्री गणेश सेवा मंडळाच्या वतीने गणपतीमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी मार्गदर्शनपर कार्यक्रम, अध्यात्मिक कार्यक्रम दोन्हीही समाजातील बांधव एकत्र येऊन मोठ्या भक्तिभावाने साजरे करत हिंदू-मुस्लिम एकोप्याचा दिला जाणारा संदेश निश्चितच कौतुकास्पद आहे.

  ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा
  या मंडळास पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, पोलीस हवालदार सुधाकर भोसले, पोलीस कर्मचारी खाडे व बकरे यांनी भेट देऊन दोन्ही समाजाचे लोकांचे अभिनंदन केले आहे.  इतर गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी खातगुण ग्रामस्थांचा आदर्श घेऊन आपापल्या गावात जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी एकत्र येवून प्रयत्नशील राहण्याचे आवाहन कांबळे यांनी केले.Sa