गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…; पुण्यातील मानाच्या पहिल्या ‘कसबा’ गणपतीचे विसर्जन

मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा वादक पथकाने केलेल्या शिस्तबद्ध वादनाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. हा जल्लोष पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.

    पुणे : पुण्यात गणरायाच्या वैभवी मिरावणुका जल्लोषात होत आहेत. ढोल ताशांच्या गजराने पुणे दुमदुमले आहे. मानाच्या गणपतीची शिस्तबद्ध मिरवणुका आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणेकरांनी पुण्यात गर्दी केली. मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा वादक पथकाने केलेल्या शिस्तबद्ध वादनाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. हा जल्लोष पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.

    अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीला मंडई चौक येथून मानाचा पहिला कसबा गणपतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आरती करून सुरूवात झाली होती. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या हा एकच जयघोष पाहण्यास मिळाला.

    या विसर्जन मिरवणुकी वेळी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार,पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्यासह हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

    ४ वाजून ३५ मिनिटांनी विसर्जन

    गुरुवारी सकाळी मंडई चौक येथे मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती १० वाजून १५ मिनिटानी झाल्यानंतर बेलबाग चौकातून अलका टॉकीज चौकाच्या दिशेने मिरवणुक मार्गस्थ झाली. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं थाटामाटात विसर्जन करण्यात आलं. नदी पात्रातील हौदात पारंपरित पद्धतीने ४ वाजून ३५ मिनिटांनी विसर्जन करण्यात आलं.

    मिरवणूकीत या ढोल पथकांचा समावेश

    प्रभात बँड, कामायनी प्रशाला, रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना ही ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या हा एकच जयघोष पाहण्यास मिळाला.