गणेशोत्सवानिमित्त मनसेचा अनोखा उपक्रम, ७ हजार ५०० गणेश मूर्ती उपलब्ध करुन देणार, या कार्यक्रमाला राज ठाकरेंची उपस्थिती

यंदा ७ हजार ५०० गणेश मूर्ती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती असून नागरिकांनी मूर्तीची किंमत ठरवून कलशामध्ये ती रक्कम टाकायची आहे.

    मनसेचा अनोखा कार्यक्रम : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पुण्यामध्ये गणपती मूर्तीचं वाटप केलं. मागील बऱ्याच वर्षांपासून गणेशोत्सवाच्या पूर्वी गणपती मूर्तीचं वाटप करण्यात येत होते. राज ठाकरे यांनी प्रतिनिधीक स्वरुपात आज पाच मूर्तींचं वाटप केलं. परंतु गणपती मूर्ती वाटपाच्या उपक्रमाअंतर्गत या वर्षी ७ हजार ५०० गणेश मूर्तीचं वाटप करण्यात येणार आहे. बऱ्याच वेळा मुर्त्यांची किंमत ही परवडणारी नसते. बऱ्याच वेळा लहान मुलांचा देखील हट्ट असतोच की मोठी बाप्पांची मूर्ती हवी. सध्या सगळीकडे सुंदर रंगांनी सजवलेले, विविध आकाराच्या गणपती बाप्पांच्या मोहात पाडणाऱ्या मूर्ती दिसत असतात.

    या गोष्टींचा विचार करत पुण्यातील प्रल्हाद गवळी मित्र परिवारातर्फे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यंदा ७ हजार ५०० गणेश मूर्ती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती असून नागरिकांनी मूर्तीची किंमत ठरवून कलशामध्ये ती रक्कम टाकायची आहे. साईनाथ चकोर, हेमंत कंठाळे, नरेश देवकर, जीवन गायकवाड, विक्रम लगड, गौरव गवळी, भाई कात्रे, श्रीराज पवार, विकास गवळी यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले आहेत.

    कोविड काळापासून ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हल्ली गणेश मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. अनेक कुटुंबांना या मोठ्या मूर्ती घेणे शक्य होत नाही, पण मोठ्या मूर्ती घेण्याचा मुलांचा हट्ट असतो. यामुळे मूर्ती आमची किंमत तुमची या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कोणाकडे पैसे नसतील तर विनामूल्य मूर्ती देखील देण्यात येते, असं हा उपक्रम सुरु करणारे प्रल्हाद गवळी यांनी सांगितलं.