गणेशोत्सवाच्या काळात खा. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघातून ५७० बस कोकणात रवाना होणार

कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ शहराच्या चौकाचौकातून या बसेस संध्याकाळी मार्गस्थ होणार आहेत.

    डोंबिवली : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. कल्याण लोकसभा क्षेत्रातील कोकण वासियांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकणातल्या प्रवाशासाठी मोफत बस सेवा देण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून एकूण ५७० एसटी बसेस मोफत उपलब्ध करून दिल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी दिली आहे. कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ शहराच्या चौकाचौकातून या बसेस संध्याकाळी मार्गस्थ होणार आहेत.

    कोकणात जाणाऱ्या एसटी बसेस मुळे डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कोकणामध्ये गणेश भक्तांना जाण्यासाठी शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी मोफत एसटी सेवा सुरू केली आहे. शेकडो एस टी बसेस डोंबिवली मध्ये दाखल झाल्या आहेत. मात्र वाहतूक पोलीसांकडून नियोजन करण्यात आले नसल्याने या एसटी बसमुळे डोंबिवली शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. घारडा सर्कल ते डोंबिवली स्टेशन रोड, घारडा सर्कल ते शिळफाटा रोड या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.