जालन्यात टोळक्याकडून पाच जणांवर तलवारीने हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील मिशन हॉस्पिटल येथे सहा जणांच्या टोळक्याने 4 ते 5 जणांवर तलवारीने वार करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली. हे टोळके विनाकारण शिवीगाळ करत असल्याने त्यांना जाब विचारण्यास गेले असता आरोपींनी त्यांच्यावर तलवार, लाठ्या-काठ्यांनी डोक्यात, पोटात व हातावर वार केले.

    जालना : शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील मिशन हॉस्पिटल येथे सहा जणांच्या टोळक्याने 4 ते 5 जणांवर तलवारीने वार करून त्यांना जखमी केल्याची घटना घडली. हे टोळके विनाकारण शिवीगाळ करत असल्याने त्यांना जाब विचारण्यास गेले असता आरोपींनी त्यांच्यावर तलवार, लाठ्या-काठ्यांनी डोक्यात, पोटात व हातावर वार केले. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले तर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

    या घटनेत जखमी झालेल्या लोकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक माने, पोलीस उपनिरीक्षक शिंदे इत्यादींनी फौजफाट्यासह घटनास्थळी भेट दिली.

    याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात दीपक जमनादास भुरेवाल यांच्या फिर्यादीवरून गंगालाल मगन भुरेवाल (वय ४२), देव गंगालाल भुरेवाल (२० वर्ष), राज भुरेवाल (वय २२), रतन मगन भुरेवाल (वय ३८), भरत गणेश भुरेवाल (वय ४०), रखी भुरेवाल (वय ३५) या सहा जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.