हायप्रोफाईल सोसायटयांत घरफोडया करणार्‍या टोळीचा पर्दाफाश, टोळीकडून १ कोटी २१ लाखांचा ऐवज जप्त; म्होरक्यावर २७ गुन्हे

पुणे : गुगलवरून (Google) माहिती घेत शहरातील हायप्रोफाईल सोसायटयांत घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे (Crime) शाखेने पर्दाफाश केला. विशेष म्हणजे, टोळी जग्वार कारमधून घरफोड्या करत होते. टोळीकडून तब्बल १ कोटी २१ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनिल पवार आणि नारायण शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. टोळीच्या म्होरक्यावर विविध राज्यात २७ गुन्हे दाखल आहेत.

म्होरक्या मोहम्मद इरफान उर्फ उजाला उर्फ रॉबिन हुड (रा. गाव जोगिया, जि. सीतामढी, बिहार), शमीम शेख (मुळ रा. बिहार), अब्रार शेख आणि राजु म्हात्रे (दोघे रा. धारावी, मुंबई) यांना अटक केली आहे. तर सुनिल यादव, पुनित यादव आणि राजेश यादव (तिघे रा. गाजियाबाद, उत्तरप्रदेश) हे तामिळनाडू पोलिसांच्या कस्टडीत आहेत. रॉबिन हुड याच्यावर उत्तरप्रदेश दिल्ली, बिहार, पंजाब, गोवा, तामिळनाडूमध्ये गँगस्टर अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट व घरफोडीचे असे २७ गुन्हे नोंद आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश माने, अजय वाघमारे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, शैलेश सुर्वे, अमोल आव्हाड, राजेंद्र लांडगे व त्यांच्या पथकाने केली आहे.

बाणेरमधील सिंध सोसायटीत घरफोडीकडून परदेशी बनावटीचे पिस्तुल, काडतुसांसह ६ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती. तपासात या गुन्ह्यात आरोपींनी चोरी करण्यासाठी बनावट नंबर प्लेट लावून जग्वार कारचा वापर केल्याचे समोर आले. तब्बल दोनशे सीसीटीव्ही तपासले. पुणे-नाशिक मार्गावरील एका फुटेजची तपासणी केली असता जग्वार कारचा खरा नंबर प्राप्त झाला. त्यावरून पोलिसांनी माग काढला असता रॉबीन हुड व त्याच्या साथीदारांनी सिंध सोसायटीत चोरी केल्याचे समोर आले.

रॉबीन हुडला दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा राज्यात वेगवेगळी ठिकाणी बदलून रहात होता. सलग ८ दिवस आरोपींचा माग काढत अखेर मुख्य सुत्रधार रॉबीन हुडला जालंधर येथून पकडले. उपनिरीक्षक मोहनदास जाधव व त्यांच्या पथकाने हुड याला जालंधरमध्ये बिगारी कामगारांचा वेश परिधान करून रॉबीन हुडला ताब्यात घेतले. गुन्हयातील जग्वार कार आणि चोरीचे पिस्तुल व सोन्याचे दागिने जप्त केले. त्याच्याकडे तपास केल्यानंतर इतरांची माहिती मिळाली. त्यानूसार, मुंबईतून शमीम शेख व इतर दोघांना पकडले. रॉबीन हुड अनेक राज्यामध्ये चोरीचे गुन्हे करताना वेगवेगळे साथीदार घेत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

चोरीच्या पैशामधून समाजकार्य

रॉबीन हुड हा चोरी केलेल्या ऐवजाची विक्री करून मिळालेल्या पैशांमध्ये समाजिक कार्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे काही व्हिडीओ देखील युटयूबवर पहावयास मिळतात. त्याने चोरीच्या पैशातून काही गावांचे रस्ते केले आहेत तर काही गरीब मुलींच्या विवाहास आर्थिक मदत केली आहे. रॉबीन हुड याला पोलिसांनी नुकताच जालंधर येथून पुण्यात आणले आहे. त्याच्याकडे सखोल तपास करणे बाकी आहे.