दागिन्यांसह रोख रक्कम लुटणारी टोळी जेरबंद; १० लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त

गर्दीमध्ये दागिणे, रोख रक्कम, किंमती वस्तू चोरी करणा-या सराईत टोळीस इंदापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेल्या सोन्यासह चोरीकरीता वापरलेली कार असा एकूण १० लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    इंदापूर : गर्दीमध्ये दागिणे, रोख रक्कम, किंमती वस्तू चोरी करणा-या सराईत टोळीस इंदापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेल्या सोन्यासह चोरीकरीता वापरलेली कार असा एकूण १० लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी सागर सोनवणे (रा. तरटगाव, ता. इंदापूर) या दि. २० डिसेंबर २०२३ रोजी दुपारी चार ते पाच वाजताच्या दरम्यान अमर ज्वेलर्स, इंदापूर येथे दागिणे खरेदीसाठी आल्या होत्या. त्यांनी २ लाख १५ हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र खरेदी करून स्वतःकडील पर्समध्ये ठेवले होते. परंतू, सराफ दुकानातील गर्दीचा फायदा घेवून अज्ञात इसमाने मंगळसूत्र चोरी केल्याची फिर्याद सोनवणे यांनी इंदापूर पोलीस स्टेशमध्ये दिली होती.

    त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शोध पथकाने इंदापूर, टेंभूर्णी, कुर्डवाडी, संभाजीनगर पर्यंतचे १०० पेक्षा अधिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक माहितीवरून विश्वजीत अर्जुन पवार (वय २१ वर्षे रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) ज्योती दिंगबर पवार (वय ३० वर्षे, रा. कुर्मेफळ, ता. जि छत्रपती संभाजीनगर) अनिता पारलेस काळे (वय ३५ वर्षे रा. वडीगोर्दी, ता. अंबड, जि. जालना) यांनी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न केले.

    सदरील संशयित आरोपी हे दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी जेजूरी येथे भाविकांची गर्दी असल्याने चोरी करण्याच्या उद्देशाने आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन चोरी केलेले फिर्यादी यांचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्हा करतेवेळी वापरलेली टोयाटो अर्बनकुझर कार (क्र. एम. एच २० एफ वाय ३३८३) ( किंमत ८ लाख रूपये) असा १० लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी पुणे, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्हयातील ब-याचा ठिकाणी चो-या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    सदरची कामगिरी पुणे ग्रामिणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, स. फौ प्रकाश माने, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, माधूरी लडकत, सलमान खान, सुनिल कदम, संतोष दावलकर, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, विशाल चौधर, गणेश डेरे, गजानन वानूळे, समीर पांडुळे, ज्योतीबा पवार, लखन झगडे यांनी केली.