सराफ व्यावसायिकास लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शिरूर शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेतील सराफ व्यावसायिकास लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पुणे जिल्हयातून हद्दपार असलेला म्होरक्या जेरबंद करून तीन गावठी पिस्टल व दोन काडतुस हस्तगत करून एकूण सुमारे १ लाख २५ हजार २०० रुपयांचा माल पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.  

    शिरूर : शिरूर शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेतील सराफ व्यावसायिकास लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पुणे जिल्हयातून हद्दपार असलेला म्होरक्या जेरबंद करून तीन गावठी पिस्टल व दोन काडतुस हस्तगत करून एकूण सुमारे १ लाख २५ हजार २०० रुपयांचा माल पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.

    या प्रकरणी मुख्य आरोपी नामे शरद बन्सी मल्लाव (१वय २४ वर्षे, रा. काची आळी, शिरूर ता. शिरूर जिल्हा पुणे) यास पकडण्यात आले. त्याच्याकडून तीन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूस व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण १ लाख ,२५ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तसेच त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर ?वय २३ वर्षे रा. धायरी पुणे) हा जखमी असून तो ससून हॉस्पीटल पुणे येथे उपचार घेत असल्याने त्यास अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शहरात मुख्य सराफ बाजारपेठेत सुभाष चौकातील अशोक जगन्नाथ कुलथे यांचे सराफ दुकान असुन दुकानाचे मालक अशोक कुलथे व त्यांचा कामगार भिका एकनाथ पंडीत वय ५० वर्षे रा. शिरूर हे रविवा दि.२८ जानेवारी रोजी संध्याकाळी साडे आठ वाजणेच्या सुमारास दुकान बंद करत असताना मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी दोन आरोपींनी गावठी पिस्टल चा वापर करून सराफ दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी भिका पंडीत यांनी विरोध केल्याने आरोपींनी त्यांच्याकडील पिस्टल मधून भिका पंडीत यांचे डोकयात पिस्टलचा बट मारला व त्यांच्यावर पिस्टलमधून गोळी फायर केली, त्याबाबत भिका एकनाथ पंडीत यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

    या प्रकरणी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणच्या वतीने तात्काळ सुरू करण्यातत आला. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या. शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेत गुन्हा घडल्याने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तपास पथकाने गुन्हयाच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित आरोपीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

    आरोपींवर गंभीर गुन्हे

    याबाबत गोपनीय माहितीचे आधारे गुन्हा हा गुन्हेगार नामे शरद बन्सी याने त्याचा साथीदार नामे सागर ऊर्फ बबलु दत्तात्रय सोनलकर याच्या मदतीने गुन्हा केला असल्याचे समजले, सदर आरोपीवर लक्ष केंद्रीत केले असता, सदरचे आरोपी हे सिंहगड किल्ल्याच्या जंगलात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने सिंहगड किल्ला परीसरातील जंगलातून गुन्हयातील आरोपींना अटक केली. यातील दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील असून आरोपी शरद मल्लाव याच्यावर एकूण सात गंभीर गुन्हे दाखल असून हा आरोपी पुणे ग्रामीण जिल्हा व अहमदनगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेले आहे. तसेच आरोपी सागर ऊर्फ बबलु सोनलकर याच्यावर दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.