काम देण्याच्या बहाण्याने महिला, बालिकांचे अपहरण; गुजरातमध्ये ओलीस ठेवून केलं जायचं लैंगिक शोषण

महिला आणि अल्पवयीन मुलींना काम मिळवून देण्याच्या बहाण्याने अपहरण करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष (एएचटीयू) ने भंडाफोड केला. पोलिसांनी एका प्रकरणाच्या तपासादरम्यान 6 आरोपींना अटक केली आहे. यात पाच महिलांचा समावेश आहे.

  नागपूर : महिला आणि अल्पवयीन मुलींना काम मिळवून देण्याच्या बहाण्याने अपहरण करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष (एएचटीयू) ने भंडाफोड केला. पोलिसांनी एका प्रकरणाच्या तपासादरम्यान 6 आरोपींना अटक केली आहे. यात पाच महिलांचा समावेश आहे.

  नंदा यादवराव पौनिकर (वय 50, रा. कांजी हाऊस चौक), गंगा गुरुचरण सिद्धू (वय 40, रा. सुराबर्डी), अंकिता चंदू उईके (वय 22, रा. इंदिरामातानगर), प्रतिक उर्फ मनोज खिमजी चांदरा (वय 28, रा. जामनगर, गुजरात), गीता संजय गोयल उर्फ गजभिये (वय 35, रा. खंडवा, मध्यप्रदेश) आणि रिंतू बंगाली उर्फ रेखा खमारी (वय 40, रा. ओडिसा), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

  नागपुरात या टोळीची प्रमुख नंदा पौनिकर आहे. ती वेगवेगळ्या राज्यांच्या लोकांशी संबंधित आहे. तिने यशोधरानगर ठाण्यांतर्गत राहणारी 26 वर्षीय पीडिता आणि दोन 17 वर्षीय अल्पवयीन मुलींना काटोल येथे काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले. नंदाने पीडितांना एका महिलेची प्रसुती झाली असून, तिच्या देखभालीसाठी सर्वांना काटोलला जावे लागेल, अशी बतावणी केली होती. 25 जुलै 2023 रोजी ती तिघींनाही काटोलला जाण्याच्या बहाण्याने रेल्वेस्थानकावर घेऊन आली. पीडित महिलेसोबत तिची 4 वर्षांची मुलगीही होती. रेल्वे स्थानकावर नंदाची साथीदार मंगला वरकडे हिने चुपचाप सर्वांचे मोबाईल काढून घेतले.

  मुलीला मारण्याची धमकी देऊन त्यांना रेल्वेने गुजरातच्या राजकोट येथे नेण्यात आले. तेथे 65 वर्षीय अज्ञात आरोपीसोबत कोर्टात नेण्यात आले. महिलेचे एक सफाई कामगार संतोष (30) याच्याशी लग्न लावून देण्यात आले. कागदपत्रांवर अंगठ्याचे ठसे घेण्यात आले. संतोषसह त्याचा भाऊ गोलू (21) आणि प्रतिक (19) यांनीही महिलेचे लैंगिक शोषण सुरू केले. मंगला पीडित मुलींशी अश्लील चाळे करीत होती. कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत पीडित महिला सप्टेंबर महिन्यात नागपूरला परतली. पोलिसात घटनेची तक्रार केली. प्रकरणाचा तपास एएचटीयूकडे सोपविण्यात आला. विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी फोन नंबर आणि लोकेशनच्या आधारावर वरील आरोपींना अटक केली.

  कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून शोषण

  गरीब कुटुंबातील महिला आणि तरुणींना काम मिळवून देण्याच्या बहाण्याने आरोपी राजकोट, जामनगर आणि गुजरातला घेऊन जात होते. तेथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून पीडितांचे शोषण केले जात होते. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ, पोलिस उपनिरीक्षक वैभव वारंगे, सहाय्यक फौजदार गजेंद्र ठाकूर, पोलिस हवालदार सुनील वाकडे, दीपक बिदाणे, शाम अंगुथलेवार, शरीफ शेख, विलास चिंचुलवार आणि अश्विनी खोडपेवार यांनी केली.