पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात

कुंजीरवाडी (Kunjirwadi) परिसरातील पेट्रोल (Petrol) पंपावर (Pump) दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. टोळीतील चौघांना पकडण्यात यश आले असून, साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.

    पुणे : कुंजीरवाडी (Kunjirwadi) परिसरातील पेट्रोल (Petrol) पंपावर (Pump) दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. टोळीतील चौघांना पकडण्यात यश आले असून, साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. या टोळीकडून घातक शस्त्र जप्त केले आहेत.

    प्रेम राजु लोंढे (वय १९, रा. आळंदी रोड), ऋषिकेश उत्तम लोंढे (वय २६), गणेश भगवान खलसे (वय २२) व तानाजी भाऊसाहेब गावडे (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक सुभाष काळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

    अटक आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर, त्यांचे साथीदार पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, शहरातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच पाहिजे-फरार आरोपी यांचा शोध घेतला जात आहे. त्यांनी यापुर्वी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास केला जात आहे. वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय चव्हाण व पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत पथक गस्त घालत होते.

    यादरम्यान, कुंजीरवाडी येथे काहीजन संशयितरित्या थांबले असून, ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, लागलीच पथक या भागात दाखल झाले. त्यांनी सापळा रचून आरोपींवर झडप घातली. चौघे पोलिसांच्या हाती लागले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन त्यांचे इतर साथीदार पसार झाले. पोलिसांनी चौघांकडून दोन लोखंडी पालघन, मिरची पुड, बॅटरी, नायलॉन दोरी आणि चिकटपट्टी असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ते पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. पण, त्यापुर्वीच त्यांना पकडले गेल्याने मोठी घटना टळली आहे. त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे.