Sasurwadi Javayala Bedam Marhan, Incident at Bedona in Arvi taluka

नियंत्रकासह चालकाला मारहाण; एकाला अटक, इतर फरार

    पुणे : खडकी बाजार परिसरातील पीएमपी स्थानकात गोंधळ घालणाऱ्यांना समजावून सांगितल्यानंतर त्या टोळक्याने पीएमपी चालक व नियंत्रकाला मारहाण केली. तर, पीएमपी बसवर दगडफेक करुन दहशत माजविली. पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखलकरत एकाला अटक केली आहे.

    वैभव पांडुरंग आगलावे, यश प्रवीण गोपनारायण (दोघे रा. महादेववाडी, खडकी), यश चांदणे, हर्षद चांदणे, प्रणव काळे, शुभम आगलावे, तरंग परदेशी, आनंद साळुंखे, मल्हार अवघडे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीएमपी चालक रामलिंग हरिभाऊ बेडके (वय ४१, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानक परिसरात आरोपी थांबले होते. ते मोठमोठ्या आवाजात बोलत होते तसेच एकमेकांना शिवीगाळ करत होते. स्थानकात गोंधळ होत असल्याने आरोपींना पीएमपी चालक बेडके यांनी समजावून सांगितले. तसेच, इथे गोंधळ न घालण्याची विनंती केली. त्याचा राग आल्याने आरोपींनी एका बसच्या काचेवर दगड मारून तिची काच फोडली. तर, बेडके यांना मारहाण करू लागले. त्यावेळी सोडविण्यास आलेले नियंत्रक गायकवाड, लहू बळी यांनी टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी गायकवाड आणि बळी यांना मारहाण केली. मारहाणीत दोघांना दुखापत झाली. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच दहशत माजविल्या प्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.