ताथवडा घाटात लूटमार करणारी टोळी जेरबंद, फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई

फलटण तालुक्यातील ताथवडा घाटात युवकाला मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम व कुरिअर पार्सल लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई दि. १७ रोजी नेर तलावाजवळ करण्यात आली. 

    सातारा : फलटण तालुक्यातील ताथवडा घाटात युवकाला मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम व कुरिअर पार्सल लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई दि. १७ रोजी नेर तलावाजवळ करण्यात आली.

    यामध्ये अजय संभाजी मदने (वय २१, रा. डिस्कळ, ता. खटाव), अक्षय संभाजी जाधव (वय २७, रा. मोहोळ, ता. खटाव), निखिल उमाजी बुधावले (वय २१), आकाश प्रभाकर जाधव (वय २२, रा. कोरेगाव), आदित्य शिरतोडे (वय २१), ललगुण (ता. खटाव) यांना नेर परिसरातील डोंगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकींसह २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑक्टोबर रोजी साडेचार वाजता ऋषिकेश अनिल मिसाळ कोळकी हा मानेवाडी येथे कुरिअर पार्सल देण्यासाठी ग्राहकांची वाट बघत मानेवाडी बस स्टॉपवर थांबला होता. यावेळी फलटण बाजूकडून दोन दुचाकीवरून आलेल्या सहा लोकांनी त्याच्या जवळ जाऊन पार्सल आहे का असे बळजबरीने विचारले. त्यातील एकाने ऋषिकेशला गाडीवरून खाली पाडून डोळ्यात दगड मारून जखमी केले. चौघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून रोख दहा हजार रुपये, मोबाईल व विविध पार्सल असलेला २७ हजार रुपयांच्या वस्तू असा एकूण ५२ हजार मुद्देमाल असणारी बॅग जबरदस्त चोरून नेली.

    पोलिसांनी पेट्रोलिंग करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधितांची माहिती मिळवली. याबाबत शेतकऱ्याने संशयित बीबी रोडला गेल्याचे सांगितले. पोलिसांनी नेर धरणाच्या भरावा जवळून पाठलाग करून संबंधित आरोपींना ताब्यात घेतले. वरील गुन्हेगार ताथवडा घाटात छोट्या मोठ्या चोऱ्या सतत करत होते सदर आरोपींपैकी अजय मदने व निखिल बुधावले यांनी दि. १३ रोजी वाखरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरील कामगाराला तलवारीचा धार दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.

    पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, सागर आरगडे, विक्रांत बनकर, हनुमान दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार, तुषार नलावडे यांनी ही कारवाई केली.