गंगावेश तालीमला ३८ वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा; मल्लविद्या महासंघ काढणार सिंकदरची हत्तीवरुन मिरवणूक

पुणे येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखने गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या २२ सेकंदात आस्मान दाखवित महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. हा बहुमान पटकाविल्याबद्दल कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने सिंकदरची हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

  कोल्हापूर : कोल्हापुरातील ‘श्री शाहू विजयी गंगावेश तालीम’चा पैलवान सिकंदर शेख यंदाच्या महाराष्ट्राच्या केसरीचा मानकरी ठरला. पुणे येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखने गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या २२ सेकंदात आस्मान दाखवित महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. हा बहुमान पटकाविल्याबद्दल कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतीने सिंकदरची हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

  फुलगाव (ता. शिरूर) येथे ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. प्रदीप कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमान या स्पर्धेचे आयोजन करण्यात अाले होते. गेल्या वर्षीच्या कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख अपयशी ठरला. ती लढत वादग्रस्त ठरली होती. सिकंदरवर अन्याय झाल्याची भावना कुस्ती शौकिनात होती. यामुळे यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे लक्ष लागून होते.

  दरम्यान यंदाच्या कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत गादी विभागात शिवराजने हर्षद कोकाटेचा पराभव केला होता. तर सिकंदर शेखने उपांत्य फेरीत संदीप मोटेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख दोघेही अंतिम लढतीत पोहोचल्यामुळे यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण ठरणार ? याविषयी उत्कंठा वाढली होती. शिवराज राक्षे डब्बल महाराष्ट्र केसरी होणार की सिकंदर शेख गेल्या वर्षीची कसर भरुन काढणार याविषयी कुस्ती शौकिनात चर्चा रंगली होती.

  गंगावेश तालीमच्या पैलवानाने तब्बल ३८ वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. दरम्यान कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ते पैलवान संग्राम कांबळे यांनी मार्च २०२२ मध्ये, ‘श्री शाहू विजयी गंगावेश तालीम’च्या पैलवानाने महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यास त्या पैलवानाची हत्तीवरुन मिरवणूक काढू अशी घोषणा केली होती. गंगावेश तालीमचा पैलवान महाराष्ट्र केसरी ठरल्यामुळे लवकरच हत्तीवरुन मिरवणूक काढू असे संग्राम कांबळे यांनी म्हटले आहे.

  शिवराज राक्षेवर २२ व्या सेकंदात मात

  महाराष्ट्र केसरीसाठी लढत सुरू होताच साऱ्यांच्या नजरा या दोन्ही पैलवानावर खिळल्या होत्या. अंतिम फेरीत सिकंदर शेखने उत्कृष्ट खेळ केला. वेगवान आणि आक्रमक खेळासाठी सिकंदर प्रसिद्ध आहे. त्या लौकिकाला साजेसा खेळ करत त्यांने कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली. शिवराज राक्षेवर २२ व्या सेकंदात मात केली. झोळी डाव घेत शिवराजला चितपट करत सिंकदरने महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदाचा मान पटकाविला.

  कुटुबांत आजोबांपासून कुस्तीचा वारसा

  सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील आहे. त्यांच्या कुटुबांत आजोबांपासून कुस्तीचा वारसा लाभला आहे. सिकंदर गेली काही वर्षे कोल्हापुरातील गंगावेश तालीममध्ये कुस्ती खेळत होता. वस्ताद विश्वास हारुगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीतील डावपेच शिकले. सिकंदरने यापूर्वी विद्यापीठ, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजविल्या होत्या.