सरकारच्या आशीर्वादानेच राज्यातील गुंडागर्दी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आराेप

राज्यात सरकारच्या आशीर्वादाने गुंडागर्दी सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

    पिंपरी : कोकणातील एक जण म्हणतो आमचा बॉस सागर बंगल्यावर तर कोण म्हणतंय वर्षा बंगल्यावर आमचा बॉस बसला आहे. त्यामुळे हे गोळ्या मारतात, लोकांचा जीव घेतात. गुंडांच्या गळ्यात गळे घालतात. राज्यात सरकारच्या आशीर्वादाने गुंडागर्दी सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

    दानवे म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिला नाही. आताचे राज्य काद्यद्याचे आहे की नाही, याचा सर्वांनी विचार करावा. साधन शुचितेचा दावा करणा-या भाजपचा आमदार पोलीस ठाण्यात सहकारी पक्षाच्या लोकांवर गोळीबार करतात. हा गोळीबार गुंडागर्दीचा प्रकार आहे. मारणारा आणि ज्याच्यावर गोळी मारली ते दोघे गुंड प्रवृत्तीचे आहेत. जमीनी, संपत्तीच्या वादातून हे प्रकार होत आहेत. मुख्यमंत्र्यांचा खासदार मुलगा वर्षा बंगल्यावर पुण्यातील नामाकिंत गुंडाला वाढदिवसानिमित्त भेटतो. महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आले आहे.

    राजकारणासाठी गुंडाचा वापर

    चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीवेळी सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना शासनातील लोकांनी बोलवले होते. निवडणूक काळात किती गुंड पॅरोलवर सुटल्याचे आम्हाला माहिती आहे. राजकारणासाठी गुंडाचा वापर केला जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी गुंड सक्रीय केले जात असल्याचा आरोप दानवे यांनी केला.