नागपूर मध्यवर्ती कारागृहातच गँगवॉर; महिनाभरात चार तक्रारी, कैद्यांवरील नियंत्रण होतंय कमी

वेगवेगळ्या कारणांमुळे मध्यवर्ती कारागृह कायम चर्चेत असते. पोलादी भींतींच्या आत घडणाऱ्या अनेक घटना आतच दबून राहतात. पण, काही घटना उशिरा का होईना हळू हळू बाहेर येतात.

    नागपूर : वेगवेगळ्या कारणांमुळे मध्यवर्ती कारागृह कायम चर्चेत असते. पोलादी भींतींच्या आत घडणाऱ्या अनेक घटना आतच दबून राहतात. पण, काही घटना उशिरा का होईना हळू हळू बाहेर येतात. गेल्या महिन्यात कारागृहातील छोटी आणि बडी गोलमध्ये गँगवार झाल्याची चर्चा समोर आली आहे. या प्रकरणांची धंतोली ठाण्यात नोंदसुद्धा झाली असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

    नाव न छापण्याच्या अटीवर ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या महिनाभरात बराकीत बंदिस्त असलेल्या टोळ्यांमधील कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याच्या सुमारे 4 तक्रारी पोलिस ठाण्यात आल्या आहेत. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कलम 324, 323 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्याने टोळीच्या म्होरक्याचे किंवा त्याच्या कोणत्याही साथीदाराचे नाव उघड केले नसले तरी, छोटी आणि बडी गोलमधील गुन्हेगारांमध्ये हाणामारी झाल्याचे त्यांनी सांगितले. ते सर्व सराईत गुन्हेगार आहेत. गुन्हेगारांमधील संघर्षामगे असणाऱ्या कारणांचा शोध धंतोली ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभावती एकूर यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आला आहे.

    कारागृहातील गुन्हेगारी घटना पाहता कैद्यांच्या मनातून प्रशासनाची भीती दूर होत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. 8 दिवसांपूर्वी छोटी आणि बड़ी गोल येथे दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर हे प्रकरण धंतोली ठाण्यात पोहोचले असून, दोन्ही टोळ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैदी आणि गुन्हेगारांमध्ये अशाप्रकारे हाणामारी होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.