Pune Drugs Connection

  अक्षय फाटक, पुणे : पुण्यात गांजा अन् एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थांची तस्करी सर्वाधिक होत असल्याचे पुणे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. गेल्या वर्षी पुण्यात तब्बल १२०० किलोहून अधिक गांजा आणि साडेतीन किलोहून अधिक एमडी हा ड्रग्ज पकडला आहे. त्यासोबतच अफिम तसेच दोडा पावडर आणि चरस व कोकेनलादेखील मागणी असल्याचे दिसत आहे. तत्पूर्वी गेल्या काही वर्षांपासून पुण्यात गांजा मोठ्या प्रमाणात पकडला जात आहे. परंतु, गेल्या वर्षात एमडीही मोठ्या प्रमाणात मिळू लागला आहे.

  पुणे पोलिसांनी कारवाईचा जोर वाढविला

  पुणे पोलिसांनी केलेल्या एमडी ड्रग्जवरील कारवाईने सध्या राज्यसह देशात खळबळ उडाली आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून पुण्यात अमली पदार्थ तस्कर सक्रिय असल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांत पुणे पोलिसांनी कारवाईचा जोर वाढविला आहे. यासोबतच मेट्रोसिटीत शिक्षण, नोकरीसोबत रिकाम्या हातांना काम मिळत असल्याने परराज्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून तरुण-तरुणाई येतात.

  पुणे शहरात सर्वाधिक तरुणाई 

  पुण्याची लोकसंख्याही कोटीच्या जवळपास आहे. तरुणाई सर्वाधिक असलेल्या या शहरात अमली पदार्थ तस्कर ओळखून असल्याने त्यांची नजर आपसूकच या शहरावर आहे. पुणे पोलिसांच्या गेल्या काही वर्षांमधील कारवाईतून वारंवार हेच दिसून आले आहे.

  वर्षात १७ कोटी ८४ लाखांचे अमली पदार्थ पकडले

  पुणे पोलिसांनी गेल्या १० वर्षात सर्वाधिक कारवाई २०२३ मध्ये केली आहे. तब्बल एका वर्षात १७ कोटी ८४ लाखांचे अमली पदार्थ पकडले आहे. त्यात २१५ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक गांजा आणि एमडी (मेफेड्रोन) हे अमली पदार्थ पकडले आहेत.
  पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गांजा हा कामगार वर्गात सर्वाधिक विकला जातो. तर, एमडी त्यासोबतच अफिम, दोडा पावडर व चरस, कोकेन असे ड्रग्ज हे महाविद्यालयीन तरुण, उच्चभ्रु आणि आयटी व बड्या हस्तींत वितरीत होतो.

  अमली पदार्थांची देशभरातून पुण्यात विक्री 

  पुण्यात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गांजा हा बांधकाम वर्ग, मजुरी करणारे व झोपडपट्टीत (स्लम भाग) विकला जातो. गांजा कमी किंमतीत मिळतो आणि सहजरित्याही उपलब्ध होतो. गांजाची २५, ५०, ७५ व १०० ग्रॅमच्या पुड्याकरून त्या विकल्या जातात. साधारण २५ ग्रॅमची पुडी १०० ते १५० रुपयांना मिळते. एमडीसह अफिम, दोडा पावडर आणि चरस व कोकेन हे अमली पदार्थ बाहेर देशातून व शहरातून पुण्यात विक्री होतात.

  एमडीसारख्या अमली पदार्थांना मागणी

  विक्री करणारे एजंट पुण्यात येत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. पुण्यातही काही एजंट यात असल्याचे पोलिसांच्या कारवाईने उघड केले होते. पोलिसांकडून सातत्याने या एजंट तसेच तस्करांवर लक्ष केंद्रीत करून कारवाई होत आहे. परंतु, पोलिसांच्या आतापर्यंतच्या कारवाईतून पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गांजाची मागणी जास्त होत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांत आता एमडीसारख्या अमली पदार्थांनाही मागणी होऊ लागली आहे.

  गेल्या १० वर्षांतील कारवाई
  वर्ष– गुन्हे–अटक आरोपी– जप्त माल किंमत
  २०१३– ६५–११४–१ कोटी ६८ लाख
  २०१४– ६६–९७– ६८ लाख ५५ हजार
  २०१५– ५४–९०– १ कोटी ३२ लाख ६९ हजार
  २०१६– ६३–८०– २ कोटी २५ लाख ६७ हजार
  २०१७– ७८–१०६– १ कोटी ३३ लाख ५४ हजार
  २०१८– ८७– ११८– १ कोटी १० लाख ११ हजार
  २०१९– ११९- १५७– ३ कोटी ८१ हजार
  २०२०– ११९– १७५– १ कोटी ९५ लाख ८ हजार
  २०२१– १०७– १५४– २ कोटी ५८ लाख २९ हजार
  २०२२– १५०– २००– ९ कोटी ९३ लाख ३२ हजार
  २०२३– १३५– २१५– १७ कोटी ८४ लाख ४६ हजार