लोणंदच्या मार्केट यार्ड परिसरात गांजा जप्त; चार चाकी वाहनांसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

लोणंद शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये १४ किलो गांजा विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. या कारवाईत दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. या गांजाची किंमत ३ लाख ६७ हजार रुपये इतकी आहे. 

    सातारा : लोणंद शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये १४ किलो गांजा विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. या कारवाईत दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. या गांजाची किंमत ३ लाख ६७ हजार रुपये इतकी आहे.

    मंगलेश भोसले (वय ३५, राहणार सोनगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे), चेतन वामन जाधव (वय ३० राहणार जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

    मंगलेश भोसले हा गांजा घेऊन लोणंद शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली होती. त्यांच्या निर्देशाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी या परिसरात सापळा रचून भोसले याला अटक केली. हा गांजा विकत घेणाऱ्या दुसऱ्या जाधव यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन चार चाकी वाहने जप्त केली असून, भोसले यांच्याकडून १४ किलो ६८४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची बाजारपेठेत ३ लाख ६७ हजार १०० रुपये किंमत आहे. या एकूण कारवाईमध्ये १४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

    मंगेश भोसले यांच्यावर बारामती तालुका कुरकुम जिल्हा सोलापूर, माळशिरस जिल्हा सोलापूर, नातेपुते व बारामती येथे विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे या कारवाईबद्दल अभिनंदन केले आहे.