पुणे-सोलापूर महामार्गावर पकडला ६३ लाखांचा गांजा, पुणे कस्टमची कारवाई

आंध्र प्रदेशातून गांजाची तस्करी करून आणलेला मोठा गांजा केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पकडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुडुर्वाडी परिसरात पथकाने गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकासह दोघांना पकडले. दोघांना पकडून त्यांच्याकडून ६३ लाखांचा २११ किलो गांजा जप्त करण्यात आला.

    पुणे : आंध्र प्रदेशातून गांजाची तस्करी करून आणलेला मोठा गांजा केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पकडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुडुर्वाडी परिसरात पथकाने गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकासह दोघांना पकडले. दोघांना पकडून त्यांच्याकडून ६३ लाखांचा २११ किलो गांजा जप्त करण्यात आला.

    याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांविरुद्ध कस्टमच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. आंध्र प्रदेशातील आरकू भागातून मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीस पाठविण्यात आल्याची कस्टमच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर कस्टमच्या पुणे कार्यालयातील पथकाने सोलापूर परिसरातील कुर्डुवाडी परिसरात सापळा लावला. पुणे-सोलापूर महामार्गावर बोरमणी गावाजावळ गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबविण्याची सूचना दिली. कस्टमच्या पथकाने ट्रकची तपासणी केली. तेव्हा ट्रकच्या आतील भागात ठेवलेल्या प्लास्टिक जाळीत (क्रेट्स) गांजा ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले.

    कस्टमच्या पथकाने २११ किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजासह ट्रक असा ९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ट्रकचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. कस्टमच्या पुणे कार्यालयातील अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक अभिषेक सिंग, अधीक्षक सुशांत त्यागी, निरीक्षक विनोद कुमार, रजत कुमार, जितेंद्र मीना, आशिष आवटी, विराज ढोकले आदींनी ही कारवाई केली.