हॉटेल बोरमलनाथमध्ये पकडला ६३ हजार किंमतीचा गांजा ; एकाच कुटुंबातील चौघे ताब्यात

यवत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

    पाटस : तालुक्यातील चौफुला – बोरीपार्धी हद्दीतील बोरमलनाथ हॉटेलमध्ये साडेतीन किलोचा ६३ हजार किंमतीचा गांजा यवत पोलीसांनी छापा टाकून जप्त केला आहे.

    याप्रकरणी भिमाबाई दत्तात्रय लकडे (वय ५६),राहुल दत्तात्रय लकडे (वय ३८),अतुल दत्तात्रय लकडे, जयश्री राहुल लकडे (सर्व रा. बोरीपार्धी चैफुला ता.दौंड जि.पुणे) या चौघांवर गुन्हा दाखल करूूू त्याना ताब्यात घेतले आहे. चौफुला- बोरीपार्धी हद्दीतील बोरमलनाथ हॉटेलमध्ये गांजा साठा असून चोरट्या पद्धतीने विकला जात असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार गुरुवारी (दि.८) यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रेखा वाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, उप पोलीस निरीक्षक विजय कोल्हे,पोलीस नाईक विकास कापरे, विशाल जाधव,राजू शिंदे, राहुल गडदे, अश्विनी देवडे आदींच्या पथकाने बोरमलनाथ हॉटेलमध्ये छापा टाकला असता भिमाबाई दत्तात्रय लकडे यांच्या मालकीचे बंद हॉटेलमधील खोलीमध्ये तब्बल साडेतीन किलो वजनाचा व ६३ हजार किंमतीचा हिरवट रंगाचा गांजाचा साठा मिळुन आला आहे. पोलिसांनी हा गांजा जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात चार जणांवर अम्लीपदार्थ , गुगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे