उल्हासनगर भाजप आमदार गोळीबार प्रकरणावर गृहमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले…

उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाडने शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलिस ठाण्यामध्येच गोळीबार केला. या प्रकरणावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Firing) भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाडने (Ganpat Gaikwad) शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर हिललाईन पोलिस ठाण्यामध्येच (Ulhasnagar Hillline Police Station) गोळीबार केला. याचे प्रतिसाद राज्यभर उमटले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या प्रकरणावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार न करता कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचा तपास केला जाईल. यासंदर्भात वरिष्ठांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर तडक कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे.” अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. आता एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होणार आहे. यामुळे उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

    उल्हासनगर मधील या गोळीबारामध्ये शिंदे गटाचे महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांच्या शरीरामधून तब्बल 6 गोळ्या काढण्यात आल्या आहेत. तसेच राहुल पाटील यांच्या हातातून 2 गोळ्या काढण्यात आल्या आहेत. महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे देखील गेले आहेत. विरोधकांनी सत्ताधारी भाजप आमदाराने केलेल्या या गोळीबारावरुन भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर गोळीबार करणाऱ्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार हा एकनाथ शिंदे यांच्यामुळे केला असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. एकनाथ शिंदेंमुळे राज्यात गुन्हेगारी वाढली असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.