गणा धावला अन् पावलाही! ‘गणपती स्पेशल’ नी प्रस्थापित केलाय गर्दी आणि उत्पन्नाचाही विक्रम; ‘या’ स्पेशलच्या झाल्यात सर्वाधिक फेऱ्या

विलंबाच्या प्रवासातही शेवटच्या दिवसापर्यंत चाकरमान्यांनी सर्वच गणपती स्पेशल गाड्यांना पसंती दिली. चाकरमान्यांच्या उदंड प्रतिसादानंतर तब्बल एका महिन्यानंता १३ सप्टेंबरपासून गणपती स्पेशल गाड्या यार्डात विसावल्या. सीएसएमटी- सावंतवाडी नियमित स्पेशलच्या सर्वाधिक ४४ फेऱ्या धावल्या.

  खेड : कोरोना संकटामुळे (Corona Pandemic) सलग २ वर्षे गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2022) चाकरमान्यांची (Chakarmani) गावी येण्याची संधी हुकली होती. याचमुळे यंदा गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता १३ ऑगस्टपासूनच कोकण मार्गावर चालवलेल्या गणपती स्पेशल गाड्यांनी गर्दीचा अन् उत्पन्नाचाही विक्रम प्रस्थापित केला (Ganpati Special Trains run on the Kokan Way set a record for crowding and revenue.).

  विलंबाच्या प्रवासातही शेवटच्या दिवसापर्यंत चाकरमान्यांनी सर्वच गणपती स्पेशल गाड्यांना पसंती दिली. चाकरमान्यांच्या उदंड प्रतिसादानंतर तब्बल एका महिन्यानंता १३ सप्टेंबरपासून गणपती स्पेशल गाड्या यार्डात विसावल्या. सीएसएमटी- सावंतवाडी नियमित स्पेशलच्या सर्वाधिक ४४ फेऱ्या धावल्या.

  गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते. कोरोनाच्या महामारीमुळे कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने सलग २ वर्षे चाकरमान्यांनी गावाकडे पाठच फिरवली होती. यंदा मात्र नियंत्रणात आलेल्या कोरोनामुळे चाकरमान्यांना गाव गाठता आले होते.

  मध्य व कोकण रेल्वे प्रशासनापाठोपाठ पश्चिम रेल्वेही कोंकण वासियांच्या दिमतीला धावत गणेशोत्सवात तब्बल ३०० हून अधिक फेऱ्या कोकण मार्गावर चालवल्याने चाकरमान्यांना गाव गाठणे सुकर झाले. नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांना तोबा गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेत रेल्वे प्रशासनानेही एकामागोमाग एक गणपती स्पेशल गाड्यांची कृपादृष्टीच चाकरमान्यांवर केली. मात्र, तरीही सर्वच गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले होते. जलद व एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या काही श्रेणींचे तिकीट काढताना “रिग्रेट” असा संदेशही आल्याने चाकरमान्यांची कोंडी झाली होती.

  यानंतर नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटाच रेल्वे प्रशासनाने सुरू ठेवल्याने गणेशभक्तांना दिलासाच मिळाला.

  ‘स्पेशल’ गाड्यांना गणेशभक्तांची पसंती

  गणरायाच्या दर्शनाची आस उराशी बाळगणाऱ्या गणेशभक्तांनी तुफानी गर्दीतूनही रेटारेटीचा प्रवास करत गाव गाठणे पसंत केले होते. परतीच्या प्रवासातही हीच परिस्थिती कायम होती. कोकण मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांची संख्या कमालीची वाढल्याने रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. हे विस्कळीत वेळापत्रक रूळावर आणताना रेल्वे प्रशासनाची दमछाक झाली. विलंबाच्या प्रवासातही गणेशभक्तांनी गणपती स्पेशल गाड्यांमधूनच सफर करणे पसंत केले.१३ ऑगस्टपासून गणपती स्पेशल गाड्या कोकण मार्गावर धावू लागल्या होत्या.

  ‘सीएसएमटी-सावंतवाडी’च्या ४४ फेऱ्या

  सीएसएमटी-सावंतवाडी नियमित गणपती स्पेशलसह नागपूर- मडगाव साप्ताहिक स्पेशलला पहिला मान मिळाला होता. गणेशोत्सव कालावधीत सीएसएमटी-सावंतवाडी गणपती स्पेशलच्या २० ऑगस्टपर्यंत १६ फेऱ्या नियमितपणे चालवण्यात आल्या तर नागपूर-मडगाव साप्ताहिक स्पेशलच्या ६ फेऱ्या चालवण्यात आल्या. इतर गणपती स्पेशल गाड्यांच्या तुलनेत ०११३७/०११३८ क्रमांकाच्या सीएसएमटी-सावंतवाडी स्पेशलच्या २१ ते ११ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आलेल्या सर्वाधिक ४४ फेऱ्यांना चाकरमान्यांनी उदंड प्रतिसाद दिला.

  नागपूर-मडगाव स्पेशल गाडीच्या १२ फेऱ्या

  नागपूर-मडगाव साप्ताहिक स्पेशलच्या १२ फेऱ्या, पुणे-कुडाळ, पुणे–थिविम, पनवेल–कुडाळ स्पेशलच्या प्रत्येकी ६ फेऱ्या चालवण्यात आल्या.

  पुणे–कुडाळ

  स्पेशलच्या ६ फेऱ्या, पनवेल-कुडाळ स्पेशलच्या ४ फेऱ्या धावल्या. लोकमान्य टिळक टर्मिनस-ठोकूर स्पेशलच्या ११ सप्टेंबरपर्यंत ३० फेऱ्या धावल्या. सीएसएमटी–ठोकूर साप्ताहिक स्पेशलच्या ६ फेऱ्यांचाही समावेश आहे. सीएसएमटी–मडगाव गणपती स्पेशलच्या १६ फेऱ्या धावल्या.

  वांद्रे-कुडाळ

  स्पेशलच्याही ६ फेऱ्या चालवण्यात आल्या. या शिवाय एलटीटी-मंगळूर एक्स्प्रेस, अहमदाबाद-कुडाळ एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेस, उधना- मडगाव एक्स्प्रेस या जलद स्पेशल गाड्यांच्या धावलेल्या अतिरिक्त फेऱ्यांमुळे चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळे दूर झाले. एकामागोमाग एक साप्ताहिक गणपती स्पेशलही दिमतीला धावल्याने गणेशभक्तांना गाव गाठणे सुलभ झाले.