बारामती नगरपालिकेच्या कचरा डेपोस आग, कोट्यावधीचे नुकसान

बारामती शहरातील नगरपालिकेच्या कचरा डेपोस आज (दि २४) पहाटे दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचऱ्याचे वर्गीकरण करणारी विविध प्रकारच्या मशिनरी तसेच कचरा जळून खाक झाला आहे.

    बारामती : बारामती शहरातील नगरपालिकेच्या कचरा डेपोस आज (दि २४) पहाटे दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचऱ्याचे वर्गीकरण करणारी विविध प्रकारच्या मशिनरी तसेच कचरा जळून खाक झाला आहे. या आगीमुळे जवळपास दीड कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

    आग लागल्याची माहिती नगरपालिकेमध्ये दूरध्वनीवरुन मिळताच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा डेपोकडे धाव घेतली. भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना यांचे अग्निबंब दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने धुराचे लोळ सर्वत्र पसरले होते.

    या आगीचे कारण समजले नसले तरी आग नेमकी कशामुळे लागली याच्या कारणांचा शोध घेतला जात असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. या आगीची तीव्रता भयावह होती. या आगीमध्ये बारामती नगरपालिका तसेच लुको कंपनीची कचरा वर्गीकरण करणारी जवळपास सात ते आठ मशिनरी जळून भस्मसात झाली आहेत. याशिवाय वर्गीकरण केलेला जवळपास ९०० टन गठ्ठे बांधून ठेवलेला कचरा देखील जळून खाक झाल्यामुळे जवळपास ४० लाख रुपयांचे कचऱ्याचे तर यंत्रणेचे जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

    बारामती शहराच्या लगत असलेल्या अंबिका नगर परिसराजवळ मोकळ्या जागेत बारामती नगरपालिकेचा हा कचरा डेपो आहे. या कचरा डेपोत बारामती नगरपालिकेच्या वतीने कचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. आज लागलेल्या या आगीमुळे ही यंत्रणा पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक यंत्रणेला यश आले असले तरी, आगीची ढग अजूनही काही प्रमाणात सुरू आहे.

    या घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्या ठिकाणी दोन सुरक्षारक्षक कार्यरत आहेत तसेच सीसीटीव्ही यंत्रणा देखील कार्यान्वित आहे, तरी देखील ही आग कशी लागली हा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यरात्री आग लागल्यानंतर बारामती नगरपालिकेत फोन आल्यानंतर या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. यादरम्यान श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना व माळेगाव कारखान्याच्या अग्निशामक गाड्या बोलवण्यात आल्या. मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.