शिक्रापुरात कचरा बंद आंदोलन ; कचरा संकलित करणाऱ्या गाड्या आणण्यास ग्रामस्थांचा विरोध

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न काहीकेल्या संपत नसताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामस्थांना तारीख पे तारीख मिळत असताना आता ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावातून कचरा संकलित करुन येणाऱ्या गाड्याच ग्रामस्थांनी रोखत कचरा बंद आंदोलन सुरु केले आहे.

    शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा प्रश्न काहीकेल्या संपत नसताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामस्थांना तारीख पे तारीख मिळत असताना आता ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावातून कचरा संकलित करुन येणाऱ्या गाड्याच ग्रामस्थांनी रोखत कचरा बंद आंदोलन सुरु केले आहे.

    शिक्रापूर (ता. शिरुर) येथील अनेक दिवसांपासून कचरा प्रश्न भेडसावत असून ग्रामपंचायतच्या वतीने वेळ नदीच्या कडेला कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असताना येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक दिवसांपासून येथील कचरा हटवण्याची मागणी ग्रामस्थ व नागरिक करत असताना ग्रामपंचायत कडून तारीख पे तारीख भेटत आहे. यापूर्वी ग्रामपंचायतने कचरा प्रकल्प मंजूर करूनही कचरा प्रकल्प गावातील राजकीय तसेच काही नागरिकांच्या विरोधामुळे पूर्ण होऊ शकला नाही.
    सध्या येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा त्रास होत असल्याने मागील महिन्यात त्यांनी आंदोलन पुकारले मात्र ग्रामपंचायतने ऑगस्ट मध्ये सदर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले परंतु कार्यवाही न झाल्याने अखेर येथील मागासवर्गीय समाजाच्या नागरिकांनी ग्रामपंचायत ला पत्र देत एकही गाडी येथे येऊ देणार नसल्याचे पत्र देत कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या सर्व गाड्या बंद केल्या असून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कचरा बंद आंदोलन सुरु केले आहे.

    यावेळी माजी उपसरपंच रमेश थोरात, प्रकाश सोंडे, सुरज चव्हाण, निलेश उबाळे, शुभम वाघ, शंतनू सोंडे, रुपेश सोंडे, साहिल सोंडे, राज जाधव, प्रशांत भोसले, माऊली खरपुडे, इकबाल तांबोळी, रोहिदास जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्या मीना सोंडे, सुरेखा गायकवाड, ललिता उबाळे,रुबिना शेख, अर्चना गजरे, राणी माघाडे, सविता वायदंडे, दिपाली जाधव, अंजना पठेकर, पुष्पा सोंडे, मंगल जाधव, मालन सोंडे, वैशाली सोंडे यांसह आदी उपस्थित होते, यावेळी बोलताना ग्रामपंचायत प्रशासनाने दोन दिवसात येथील सर्व कचरा हटवून कचऱ्याचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही हरित लवादा कडे तक्रार करणार असल्याचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण सोंडे यांनी सांगितले.

    आंदोलन दरम्यान वार्डातील एकाही सदस्य नसल्याची खंत
    शिक्रापूर गावातील सर्व कचरा वार्ड क्रमांक सहा मध्ये आणून टाकला जात असल्याने नागरिकांनी मागणी करुन देखील कचरा हटवण्यात येत नसल्याने मागासवर्गीय समाजाने आंदोलन सुरु केले मात्र सदर वार्डातील एकही ग्रामपंचायत सदस्य यामध्ये उपस्थित नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.

    ग्रामपंचायतची मिटिंग घेऊन निर्णय घेऊ
    शिक्रापूर येथील कचरा बंद आंदोलनाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यकारिणीची मिटिंग बोलावण्यात आलेली असून, सदर मिटिंग मध्ये चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.