गॅस दरवाढीने महिला वर्ग हैराण; गोवऱ्यांचा वाढला वापर, सरपणासाठी जंगलाकडे धाव

गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder Prices) दरवाढीचा बोजा नागरिकांवर आल्याने ग्रामीण भागांतील महिलांचा ओढा पुन्हा एकदा चुलीकडे वाढला आहे. अनेक गावातील महिला सरपणासाठी जंगलाकडे धाव घेत असून, उन्हाळ्यात जमा केलेल्या गोवऱ्यांचा वापर स्वयंपाक व आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी गेला जात आहे.

    धानोरा : गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder Prices) दरवाढीचा बोजा नागरिकांवर आल्याने ग्रामीण भागांतील महिलांचा ओढा पुन्हा एकदा चुलीकडे वाढला आहे. अनेक गावातील महिला सरपणासाठी जंगलाकडे धाव घेत असून, उन्हाळ्यात जमा केलेल्या गोवऱ्यांचा वापर स्वयंपाक व आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी गेला जात आहे.

    शहरात जरी तंत्रज्ञानाचा झगमगाट असला तरी ग्रामीण भागात मात्र याला फार स्थान नाही. आजही ग्रामीण भागात स्वयंपाकासाठीच्या चुली नाहीशा झाल्या नाहीत. फरक एवढाच की चुलीचा वापर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात बहुतांश गावात चुलीचा वापर केला जात आहे.

    धावपळीच्या जीवनामध्ये गॅस शेगडीसारख्या उपकरणांचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरात ही उपकरणे सर्वच नागरिक वापरताना दिसत आहेत. हळूहळू ही पद्धत ग्रामीण भागात आली आहे. आज बऱ्याच लोकांकडे गॅस सिलिंडरचा वापर होतो. मात्र, गॅस सिलींडरचे दर गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत.

    पारंपरिक शेगडीचाही होतोय वापर

    आजही चुलीचा उपयोग स्वयंपाक तयार करण्यासाठी केला जात आहे. पाणी गरम करण्यासाठी चुलीसह शेगडीचाही वापर होत आहे. या चुली किंवा पारंपरिक शेगडीसाठी इंधन म्हणून पूर्वीपासून लाकडाचा भुसा, कोळशाची चुरी व शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जात आहे. ग्रामीण भागात नागरिक शेणापासून गोवऱ्या तयार करत असतात.