Gauri-bhide-uddhav-thackeray

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबा मालमत्ता जमवल्याचा आरोप करणारी जनहित याचिका दादरमधील रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी दाखल केली होती. ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीवर बोट ठेवत संपत्तीचा ताळमेळ लागत नसल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला होता.

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि त्यांच्या कुटुंबियांना उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गौरी भिडे यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने (Gauri Bhide Petition Rejected) फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांकडे आरोप सिद्ध करणारे पुरावे नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. याचिका म्हणजे न्यायिक प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचा ठपका ठेवून न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. तसेच याचिकाकर्त्यांना गौरी भिडे यांना २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबा मालमत्ता जमवल्याचा आरोप करणारी जनहित याचिका दादरमधील रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी दाखल केली होती. ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीवर बोट ठेवत संपत्तीचा ताळमेळ लागत नसल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला होता. याप्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेतून केली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने आपला ८ डिसेंबर २०२२ रोजी राखून ठेवलेला निर्णय मंगळवारी जाहीर केला. कोर्टाने ही याचिका आरोप सिद्ध करतील असे पुरावे नसल्याने फेटाळली आहे.

याचिका गृहितकांच्या आधारावर
उद्धव ठाकरे सत्तेत नसल्यामुळे तपास यंत्रणांवर प्रभाव टाकतील असे म्हणता येणार नाही. दुसरीकडे, याचिकाकर्त्यांनी तथ्यांऐवजी गृहितकांच्या आधारावर याचिका आणि त्यातील आरोप केल्याचा दावा वरिष्ठ ठाकरेंकडून करण्यात आला होता. याचिकाकर्त्यांनी सर्वप्रथम पोलिसांकडे तक्रार न करता थेट कायदेशीर पर्यायांचा वापर केला. उच्च न्यायालय केवळ असाधारण परिस्थितीत आपल्या अधिकारांचा वापर करू शकते, असेही ठाकरे यांच्या कडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

याचिकेतले मुद्दे
प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय आहेत?  कोरोना काळात सामना या वृत्तपत्राला इतका फायदा कसा काय झाला? असे प्रश्न याचिकेत विचारण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री असताना २०२० ते २०२२ या कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर ४२ कोटी रुपये होता. यातील साडे अकरा कोटी रुपयांच्या नफ्यावरदेखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शिवाय उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय? त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

गौरी भिडे कोण?
गौरी भिडे या प्रकाशक आहेत, त्यांच्या आजोबांची ‘राजमुद्रा’ नावाची प्रकाशन संस्था आहे. सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी संपत्ती गोळा करणं अशक्य असल्याचा आरोप गौरी भिडे यांनी केला आहे. आपलाही हाच व्यवसाय असून दोघांच्या उत्पन्नात एवढा फरक कसा? असा प्रश्न गौरी भिडे यांनी विचारला आहे.