गौतम अदानींनी घेतली शरद पवार यांची भेट; बंद दाराआड नेमकं काय झाली चर्चा?

अदानी उद्योग समूहाचे गौतम अदानी यांनी गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या.

    मुंबई : अदानी उद्योग समूहाचे गौतम अदानी यांनी गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. या भेटीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

    एकीकडे धारावीचा मुद्दा उद्धव ठाकरे गटाकडून महत्त्वाचा केला जात असताना दुसरीकडे आदानी आणि शरद पवार भेट झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. या आधीही शरद पवार आणि गौतम अदानी यांची अनेकदा भेट झाली आहे. पण आता अदानींनी अचानक पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

    धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी ग्रुपला दिल्याच्या विरोधात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अदानींच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. या मोर्च्यात काँग्रेस आणि शरद पवार गटाचे कार्यकर्तेही सामील झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मागणी केली होती की, सरकारने धारावीचा विकास प्रकल्प अदानींना न देता स्वत: करावा. आता उद्धव ठाकरे गटाकडून धारावी बचाव आंदोलन करत अदानींना विरोध केला जात असताना अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.