जरा हटके! अंधश्रद्धेला मूठमाती देण्यासाठी रात्रीच्या सुमारास Cemetery त साजरा केला वाढदिवस

अनेक जण आपला वाढदिवस हॉटेल, फार्म हाऊस, पिकनिक पॉईंट किंवा एखादा हॉल घेत साजरा करत असतात. मात्र अंधश्रद्धेच्या जोखाडातून समाजाला मुक्त करण्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या संकल्पनेतून मोरे व त्यांच्या सहकारी मित्रांनी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करत उपस्थितांना केक देऊन जेवण देण्याची योजना आखली.

  • केक कापत चिकन बिर्याणीचाही बेत करून केली जनजागृती

कल्याण : कल्याण (Kalyan) जवळील मोहने (Mohane) येथील उल्हास नदी जवळच्या स्मशानभूमीत (Cemetery Near Ulhas River) रात्रीच्या सुमारास एका अवलियाने वाढदिवसाचा (Birthday Celebration) केक कापत आप्तेष्ट व मित्रमंडळीं तसेच महिला व लहान मुलांना चिकन बिर्याणीचे जेवण दिल्याने कर्मकांडांवर विश्वास ठेवणाऱ्यांना मोठी चपराक बसली आहे. भूत भुताटकी, चेटूक, काळी जादू, करणी, व भानामतीच्या समाजात पसरलेल्या भंपक कल्पनेला तिलांजली दिली आहे. अंधश्रद्धेला मूठमाती देत आगळा पायंडा पाडला आहे.

अंधश्रद्धे विरोधात एकिकडे समाज प्रबोधनासाठी शिक्षित तरुण-तरुणी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत स्वतःला झोकून देत काम करताना दिसून येत आहेत. मात्र तरीही सुशिक्षित असणारे समाजातील काही घटक अंधश्रद्धेपोटी बकऱ्या कोंबड्यांचे बळी व उतारा देणारा घटक आजही या जडणघडणीत कार्यरत असताना दिसून येत आहे.

भोंदू बाबा, महाराज फसवेगिरीमुळे कारागृहात आपले जीवन व्यतीत करीत असतानाही त्यांचे शिष्य व भक्तगण त्यांच्या भक्तीचा मार्ग सोडत नसल्याचे दिसून येत आहे. अंधश्रद्धेपोटी संपूर्ण करतात उध्वस्त झाल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोहने येथील गौतम रतन मोरे (Gautam Ratan More) यांनी स्मशानभूमीत रात्रीच्या दरम्यान आपला आगळावेगळा वाढदिवस साजरा केला.

अनेक जण आपला वाढदिवस हॉटेल, फार्म हाऊस, पिकनिक पॉईंट किंवा एखादा हॉल घेत साजरा करत असतात. मात्र अंधश्रद्धेच्या जोखाडातून समाजाला मुक्त करण्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या संकल्पनेतून मोरे व त्यांच्या सहकारी मित्रांनी स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करत उपस्थितांना केक देऊन जेवण देण्याची योजना आखली आणि ती प्रत्यक्षात १९ नोव्हेंबरच्या रात्री अंमलातही आणली.

शनिवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान गौतम मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक महिला लहान मुले मुली स्मशानभूमीत आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होते. स्मशानात केक कापत वाढदिवस साजरा करत असतानाच मृत इसमाचे अंतिम दहन करण्यासाठी बनविलेल्या स्टँडवर काही कार्यकर्त्यांनी बसून चिकन बिर्याणीचा आस्वाद घेतला. या समयी महिला वर्ग प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होता तर लहान मुला मुलींनी देखील येथे केक खात चिकन बिर्याणीचे कुठलाही संकोच न बाळगता पोटभर जेवण केले. स्मशानभूमीत साजरा केलेल्या अनोख्या पद्धतीच्या वाढदिवसाचे येथे विशेष कौतुक केले जात असून यानंतर अशाच स्वरूपाचे वाढदिवस स्मशानात साजरे करण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले.

स्मशानभूमीत साजरा होत असणाऱ्या या अनोख्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने अनिसचे डीजे वाघमारे, अविंधा वाघमारे, आनंद सोनवणे, संदीप शेंडगे, जीएम राजगुरू, सचिन बोराडे, राजेश मोरे, अस्तिक राजगुरू, रामनाथ गायकवाड, उषा भोईर, कृष्णा ताई गायकवाड, सुशील भडांगे, राहुल सावंत, सुनीता शेंडगे, अश्विन गाडे, यांच्यासह लहान मुले विद्यार्थी आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.