कृत्रिम पाणवठ्यावर पाणी टाकताच रानगवा हजर

जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार विपुल निसर्ग सौंदर्याने तसेच घनदाट जंगलाने व्यापलेले आहे. कासपठार परिसरातील जंगलात विविध प्रकारचे प्राणी आढळतात. पावसाळा संपल्यानंतर या परिसरात असणारे जंगली पाणवठ्यावरचे पाणी कमी होते.

    कास पठार / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार विपुल निसर्ग सौंदर्याने तसेच घनदाट जंगलाने व्यापलेले आहे. कासपठार परिसरातील जंगलात विविध प्रकारचे प्राणी आढळतात. पावसाळा संपल्यानंतर या परिसरात असणारे जंगली पाणवठ्यावरचे पाणी कमी होते. पाणी कमी होत असल्याने सातारा वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कासपठार परिसरातील जंगलात जवळजवळ शंभर पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यावर नोव्हेंबर महिन्यापासून कासपठार कार्यकारी समिती पाणी सोडण्याचे काम करत असते.

    प्रत्येक पाणवठ्यावर दर दोन-तीन दिवसांनी जंगली जनावरांसाठी या पाणवठ्यावर पाणीपुरवठा केला जातो. परंतु, काल मात्र असाच एक प्रसंग कासपठार समितीचे कर्मचाऱ्यांना अनुभवायला मिळाला.

    सातारा कास रस्त्यावरील घाटाई फाट्यावरील पाणवठ्यावर वन समितीचे कर्मचारी पाणी सोडत असताना चक्क रानगवे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येऊ लागले.

    वन समितीचे कर्मचारी प्रदीप शिंदे यांनी पाईप पाणवठ्यावर सोडून समितीने पाणीपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या दिशेने आले. उन्हाची तीव्रता असल्याने पाण्यासाठी वणवण भटकणार्‍या प्राण्यांना कास पठार समितीने तयार केलेले पानवठे जंगली प्राण्यांसाठी जीवदान ठरत आहेत.

    कासपठार समितीच्या आणि वन विभाग सातारा यांच्या सामाजिक उपक्रमांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

    कास पठार समिती वनसंपदेचे रक्षण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी राखण्याचं काम सातत्याने करत असते. या भावनेतूनच कास पठार जंगल परिसरात पाणवठे तयार करण्यात आले असून, आमच्या समितीचे चार ते पाच कर्मचारी रोज या जंगली प्राण्यांसाठी उन्हातान्हाची पर्वा न करता पाणी सोडण्याचे काम करत असतात. हीच आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.

    – दत्ता किर्दत, उपाध्यक्ष, कासपठार कार्यकारी समिती.