गावठी पिस्तूल राऊंडसह लोखंडी वाघनख्या जप्त; पंढरपूर शहर पोलीस स्टेशनची कारवाई

पंढरपूर येथील एका तरुणाकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, गावठी बनावटीचा राऊंड व वाघनख्या जप्त केल्या. अभिजित रामा भोरे (वय २६, रा.पवार नगर, इसबावी, पंढरपूर) असे संशयित तरुणाचे नाव आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली.

    पंढरपूर : पंढरपूर येथील एका तरुणाकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, गावठी बनावटीचा राऊंड व वाघनख्या जप्त केल्या. अभिजित रामा भोरे (वय २६, रा.पवार नगर, इसबावी, पंढरपूर) असे संशयित तरुणाचे नाव आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस पंढरपूर शहरात गस्त घालत असताना पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. यावेळी इसबावी येथील एका हॉटेलच्या पाठीमागे एक तरुण कमरेला पिस्तूलसारखे हत्यार लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

    पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना याची माहिती मिळताच त्यांच्या आदेशानुसार पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी गेले. येथे तरुण संशयितरित्या हॉटेलमागे सिमेंट रोडलगत येत असताना आढळुन आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला. त्याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूचे खिशामध्ये एक लोखंडी गावठी बनावटीचा राउंड, एक १२ बोअर रायफलचा राउंड तसेच एक लोखंडी बनावटीच्या वाघनख्या मिळून आल्या.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, सहायक फौजदार राजेश गोसावी, नागनाथ कदम, हवालदार शरद कदम, सूरज हेंबाडे, सिरमा गोडसे, बिपीनचंद्र ढेरे, नवनाथ माने, सचिन हेंबाडे, पोलिस कर्मचारी शहाजी मंडले, नीलेश कांबळे, समाधान माने, बजरंग बिचकुले, सायबर शाखेचे पोलिस अंमलदार योगेश नरळे यांनी केली.