नांदेड मृत्यूप्रकरणी डीनला टॉयलेट साफ करायला लावणं पडलं महागात; शिंदे गटाच्या खासदारावर गुन्हा दाखल

Nanded Govt Hopital : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू असल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांनी डीनला शौचालयाची सफाई करायला लावल्याने वातावरण तापले आहे.

  Nanded News : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात (Nanded Govt. Hospital) 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. राजकीय पक्षांनी या घटनेवरुन सरकारला धारेवर धरले आहे. मृतांमध्ये 16 बालकांचा समावेश असल्याने हे प्रकरण आणखीनच तापलं आहे. औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावल्याने खळबळ उडाली होती. मात्र याप्रकरणी शिंदे गटाच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्धा गुन्हा दाखल

  हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाताना शौचालयाची सफाई करायला लावली होती. याच प्रकरणात अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्या तक्रारीवरुन खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हेमंत पाटील आणि अन्य 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

  मार्डचे डॉक्टर खासदारांच्या विरोधात आक्रमक 

  दुसरीकडे, राज्यातील मार्ड डॉक्टर खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड मधील शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता यांच्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी माफीची मागणी केली आहे. अन्यथा संपूर्ण राज्यातील डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे मार्डने म्हटलं आहे. मार्डने पत्रक काढून ही मागणी केली आहे.

  सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

  नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचा कारभारबाबत खासदार हेमंत पाटील यांनी संताप व्यक्त केला होता. रुग्णालयातील स्वच्छतागृह, शौचालय ब्लॉक होते. त्यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेवरुन खासदार हेमंत पाटील यांनी डीनना धारेवर धरलं. अधिष्ठातांना सोबत घेऊन हेमंत पाटील यांनी चक्क त्यांच्या हातात झाडू देऊन शौचालय साफ करायला लावले. शौचालयात पाणी टाकून अधिष्ठातांना साफसफाई करायला लावली. रुग्णांच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असून सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली होती.