नवी मुंबईकरांना बाप्पा पावला, मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १००% पातळी

स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असून मोरबे धरणाव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेकडे अनमोल अशी जलसंपत्ती आहे.

    घणसोली : मागील आठवडाभर झालेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण संपूर्ण १००% भरले असून प्रतिदिन ४५९ द.ल.लि. क्षमतेचे ८८ मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केल्याने आज २४ सप्टेंबर रोजी रात्री १.३० वाजता सांडव्याचे दोन्ही दरवाजे १५ से.मी. उघडण्यात आलेले आहेत व‌ ६७५ क्युसेक इतका विसर्ग सांडव्यातून सोडण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना जलदिलासा लाभलेला आहे.

    स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असून मोरबे धरणाव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेकडे अनमोल अशी जलसंपत्ती आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी जलस्त्रोतावरील या धरण प्रकल्पाचा परिसर नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला असून माथेरानच्या प्रदूषणविरहित प्रदेशातून येणारा हा जलस्रोत असल्याने येथील पाणी मूलत:च शुध्द आहे.

    यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत ३५४०.०० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत १९०.८९० द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे. यावर्षी उत्तम पर्जन्यवृष्टीमुळे मोरबे धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांना मिळालेली ही मोठी भेट असल्याचे सांगत नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच आसपासच्या शहरांतील जलस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.