घोडगंगा सुरू करणार की नाही?, आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा दहा डिसेंबरनंतर…; दादा पाटील फराटे यांचा इशारा

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात घोडगंगा सहकारी साखर कारखाना व यशवंत सहकारी साखर कारखाना असे दोन सहकारी साखर कारखाने अस्तित्वात आहेत. यापैकी यशवंत सहकारी साखर कारखाना गेल्या सुमारे १६-१७ वर्षांपासून बंद आहे.

  उरुळी कांचन : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात घोडगंगा सहकारी साखर कारखाना व यशवंत सहकारी साखर कारखाना असे दोन सहकारी साखर कारखाने अस्तित्वात आहेत. यापैकी यशवंत सहकारी साखर कारखाना गेल्या सुमारे १६-१७ वर्षांपासून बंद आहे. आता उरलेला एकमेव सहकारी तत्त्वावर आधारित सहकारी साखर कारखाना, जो चालू होता; पण यावेळी अद्याप सुरु झाला नाही, असा रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सध्या बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

  या साखर कारखान्याचा गळीत हंगाम अद्याप सुरू झाला नसल्याने या कारखान्याचे विरोधी गटातील एकमेव संचालक जे यापूर्वी दहा वर्ष कारखान्याचे उपाध्यक्ष होते, असे दादा पाटील फराटे यांनी शिरूर येथे एक पत्रकार परिषद घेऊन कारखान्याच्या विद्यमान चेअरमन ऋषिकेश पवार व माजी चेअरमन तथा शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना आपण कारखाना चालू करणार आहात किंवा नाही? याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशाप्रकारचे आवाहन केले आहे.

  १० डिसेंबरपर्यंत आपण आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही आमची भूमिका मांडू, अशाप्रकारचे वक्तव्य दादा पाटील फराटे यांनी या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व माजी संचालक सुधीर फराटे, महेश ढमढेरे, राहुल गवारे, राजेंद्र कोरेकर, पीएमआरडीए संचालक प्रकाश गव्हाणे, एकनाथ शेलार, दत्तात्रय शेंडगे, अशोक गारगोटे, उमेश शेलार, रणजीत शेलार, प्रमोद दंडवते आदी मान्यवर उपस्थित होते.

  दादा पाटील फराटे पुढे म्हणाले की, कारखाना बंद पडल्यानंतर त्याच्यावर उपाय शोधणे अत्यंत जिकीरीचे आणि अवघड होऊन जाते आणि म्हणूनच कारखाना बंद पडण्याअगोदरच आपण काळजी घेतलेली, तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची राहील. मतदारसंघातील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा अनुभव आपल्या पाठीशी आहेच. जो कारखाना चांगल्या पद्धतीने चालत होता, तो बंद पडण्याअगोदर जर काळजी घेतली असती, तर हवेली तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांचे आता जे अतोनात हाल होत आहेत, ते हाल झाले नसते अशी प्रतिक्रिया दादा पाटील फराटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

  फराटे म्हणाले की, कारखान्याच्या निवडणुकीत आमदार अशोक पवार यांनी कारखान्यावर कोणतेही थकीत कर्ज नसल्याचे जाहीर केले होते. गेल्या वर्षभरामध्ये कामगारांचे पगारही कारखाना देऊ शकला नाही. त्यामुळे कामगारांनी १०० दिवसांचे काम बंद आंदोलन केले, ते आंदोलन मागे घेऊन आज ६० दिवस होत आले तरी त्यांचा पगारही दिला नाही आणि कारखाना ही चालू केला नाही.

  कारखान्याचे चेअरमन व अन्य संचालक यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कोणतीही साधनसामग्री कामगारांना पुरवलेली नाही, तोडणी व वाहतुकीची यंत्रणा उपलब्ध केलेली नाही, किंवा त्यांना उचलही दिलेली नाही. घोडगंगा कारखान्याच्या सभासदांनी कारखान्यावर नोंद केलेला ऊस, कोणत्या कारखान्यांना द्यायचा याबाबतही सभासदांना जागृत केले नाही, असा भोंगळ कारभार सुरू असताना, घोडगंगा चालू होणार का? बंद पडणार? या चिंतेत ऊस उत्पादक सभासद शेतकरी आहेत.

  कारखान्याच्या अधोगतीला फक्त आमदार अशोक पवारच जबाबदार आहेत. प्रत्येकवेळी आपली जबाबदारी झटकून, कधी दादा पाटील फराटे, कधी माजी आमदार कै. बाबुराव पाचर्णे तर कधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोष देत, आपण शेतकरी हितासाठी काम करत असल्याचा आव आणण्याचा कारभार अशोक पवार करीत आहेत हे त्यांनी बंद करावे. कारखाना प्रचंड आर्थिक अडचणीत असतानाही नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात कारखान्याने कायदा व सल्ला यासाठी ४८ लाख रुपये खर्च केल्याचे दाखवले आहे.

  सभासदांनी मला निवडून दिले असतानाही माझे संचालकपद रद्द करण्यासाठी सहकार न्यायालयात आमदार अशोक पवार यांनी दावा दाखल केला आहे, कारखाना नीट चालविण्यापेक्षा विरोधी संचालकाचे संचालकपद रद्द करण्यास आमदारांना प्राधान्य द्यावे वाटते. यावरूनच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांबाबतची त्यांची कळकळ दिसून येते.

  कारखान्यास कर्ज मिळण्याबाबत आशावादी

  रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने सहवीज निर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता. त्यानंतर तत्कालीन भाजप सरकारने वीज खरेदी करार करण्यास विलंब केल्याने कारखान्याचे आर्थिक नुकसान होऊन तो अडचणीत आला आहे. कारखान्यास कर्ज मिळण्याबाबत आपण आशावादी असून या प्रश्नावर लवकरच मार्ग निघेल, अशी आशा आहे.

  – अशोक पवार, आमदार, शिरूर हवेली.