"Manoj Jarange is no longer sorry, he now..."; Girish Mahajan gave the final warning, saying, "We cooperated a lot...."

  Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, ही मागणी घेऊन उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी भर सभेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर टीका केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळल्याने उपचार घेण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. परंतु, तब्येत बरी झाल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलन करेन, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावर आता ग्रामविकास आणि पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  मनोज जरांगे पाटलांना आम्ही खूप सहकार्य केलं

  गिरीश महाजन म्हणाले, मनोज जरांगे पाटलांना आम्ही खूप सहकार्य केलं, त्यांची मदत केली, त्यांचा मानसन्मान केला, मी स्वतः सहा वेळा त्यांच्याकडे गेलो होतो, माझे सहकारी मंत्रीदेखील माझ्याबरोबर होते. मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्तींना त्यांच्याकडे पाठवले होते, मुख्यमंत्री स्वतः दोन वेळा त्यांना भेटायला गेले. परंतु, मनोज जरांगे ऐकायला तयार नाहीत. आम्ही जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वकाही केले. तरीदेखील मी म्हणेन तेच करा, नसेल करायचं तर तुमचा सत्यानाश करून टाकेन, तुमचा पक्ष संपवून टाकेन, तुम्हाला पदावरून खाली उतरवेन अशी वक्तव्ये त्यांनी केली.

  देवेंद्र फडणवीस यांना जातीवाचक शिविगाळ

  मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी चुकीचं भाष्य केलं. छगन भुजबळांबाबतही तेच केलं. परवा तर त्यांनी कळसच केला. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीवाचक शिविगाळ केली. त्यांचं नाव घेऊन आई-बहिणीचा उल्लेख केला. त्यामुळे त्यांना आता माफी नाही. गिरीश महाजन म्हणाले, मनोज जरांगे यांचं बोलणं कोणालाही आवडलेलं नाही. महाराष्ट्रात कुठल्याही लोकांना ते आवडलं नाही. मराठा बांधवांना त्यांचं बोलणं पटलं नाही.

  मोदी कसे येतात तेच बघतो

  मला वाटतं की, जरांगेंनी आता त्यांच्या मर्यादेत बोलावं. आम्ही त्यांचे खूप लाड केले. परंतु, त्यांना वाटत होतं की आता मी महाराष्ट्राचा राजा झालो आहे… मी म्हणेन तीच पूर्व दिशा… मी म्हणतोय तोच निर्णय घ्या… याला आरक्षण द्या… त्याला देऊ नका… तुमचा सत्त्यानाश करू…तुला संपवून टाकतो…मोदी कसे येतात तेच बघतो… असं सगळं त्यांचं चालू होतं.

  मनोज जरांगे यांच्या डोक्यात हवा

  मोदींसह मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख केला जात होता. व्यासपीठावर अशा प्रकारची भाषा वापरली जाते का? ग्रामविकास मंत्री म्हणाले, मनोज जरांगे यांच्या डोक्यात हवा गेली आहे. मोठी गर्दी पाहून ते काहीही बोलू लागले आहेत. परंतु, लोकांनी आता त्यांना खाली उतरवायला सुरुवात केली आहे. कारण ते मराठा आरक्षण सोडून राजकारणावर आले आहेत. मी त्यांना एवढंच सांगेन की, राजकारण हे तुमचं काम नाही.