रानगावच्या राॅयल रिसाॅर्टमध्ये बुडून मुलीचा मृत्यू

बुधवारी सकाळी विरारच्या कारगिल नगर येथे राहणारी एक महिला आपल्या रिध्दी माने या १० वर्षीय मुलीसह रानगावच्या रॉयल रिसॉर्टमध्ये गेली होती.

    वसई : वसई-रानगाव येथील रिसाॅर्टच्या तरण तलावात बुडून एका १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. वसईच्या समुद्र किनारी अनेक अनधिकृत रिसाॅर्ट आहेत. या रिसाॅर्टमध्ये मद्यपान, अनधिकृत खेळणी, सुरक्षा रक्षक नसलेले तलाव, लाॅज आहेत. महसुल, राज्य उत्पादन शुल्क, पोलीस अशा कुठल्याही प्रशासनाची परवानगी न घेता ही रिसाॅर्ट उभारण्यात आली आहेत. सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे थंडगार होण्यासाठी शहरातील शेकडो कुटुंबे अशा रिसाॅर्टमध्ये सहलीसाठी जातात.

    बुधवारी सकाळी विरारच्या कारगिल नगर येथे राहणारी एक महिला आपल्या रिध्दी माने या १० वर्षीय मुलीसह रानगावच्या रॉयल रिसॉर्टमध्ये गेली होती. रिद्धी आणि तिची आई दोघेही तरण तलावात उतरले होते. काही वेळाने तिची आई रिसॉर्टच्या खोलीमध्ये गेली होती. त्याचवेळी रिद्धीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी वसई पोलीसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात केली असून, तपासाअंती पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस निरिक्षक रणजीत आंधळे यांनी सांगितले.

    वसईच्या किनारपट्टीवरील रिसाॅर्टमध्ये आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. पोहता न येणारे ही तरणतलावात उतरतात. त्यांच्या सुरक्षेचे कोणतीही उपाय योजना रिसाॅर्टवाल्यांकडून केली जात नाही. तरण तलावात टायर, ट्युब्सभोवती सुरक्षा रक्षक, जीवरक्षक नेमणे आवश्यक असताना, रिसाॅर्ट चालक पैसे वाचवण्यासाठी अशाप्रकारे पर्यटकांचा बळी घेत आहेत. पोलिसांकडून त्यांच्यावर कोणतीही कडक कारवाई केली जात नाही. त्यामुळे रिसाॅर्ट चालक मदमस्त झाले आहेत.