‘मनोज जरांगेंना उमेदवारी द्या’, महाविकास अघाडीच्या बैठकीत वंचित आघाडीचा प्रस्ताव

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

    मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या राजकारणातील प्रवेशाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केले. जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज उभा असल्याने त्यांनी राजकारणामध्ये यावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

    आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. लोकसभेच्या जागावाटपाबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेतेदेखील उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना जालनामधून उमेदवारी देण्यात यावी, अशी वंचित बहुजन आघाडीने मागणी केली. तसेच कोणत्याही पक्षाशी युती नसताना 27 मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीने लढण्याची तयारी केली आहे. ते मतदारसंघ कोणते याची यादी देखील बैठकीत वंचितकडून देण्यात आली आहे.

    वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. पुंडकर म्हणाले, “आम्ही मागच्या जून-जुलैमध्ये लक्ष केंद्रीत केलेल्या मतदारसंघाची यादी तयार केली होती. ती यादी आम्ही महाविकास आघाडीला दिली आहे. यासोबत आम्ही 4 मागण्या अधिकच्या ठेवल्या आहेत. जालना लोकसभा मतघारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजीत वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन उमेदवार असावेत, असा प्रस्ताव दिला. आम्ही एकूण 27 जागांचा प्रस्ताव दिलाय. यापैकी काही जागांचा अपवाद सोडून इतर सर्व जागांवर आम्ही चर्चेला तयार आहोत,” असे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी स्पष्ट केले आहे.