‘मनपा नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या’; माजी नगरसेवकाकडून केली जातेय मागणी

महापालिकेचा आकृतिबंध हा वर्ग संवर्गानुसार असून, 7092 पदे मंजूर असून, त्यात 2500 पदे रिक्त आहेत. दरम्यान, नोकर भरतीत कंत्राटी कामगारांना व स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्यावे.

    नाशिक : महापालिकेचा आकृतिबंध हा वर्ग संवर्गानुसार असून, 7092 पदे मंजूर असून, त्यात 2500 पदे रिक्त आहेत. दरम्यान, नोकर भरतीत कंत्राटी कामगारांना व स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्यावे. तसेच पालिका रुग्णालायत कंत्राटी पद्धतीने असलेल्या डॉक्टरांना कायम करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक जगदीश पवार (Jagdish Pawar) यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे केली.

    निवेदनात म्हटले की, शहराचा विस्तार होत असताना 24 खेड्यांमध्ये इमारती उभ्या राहिल्यामुळे लोकसंख्याही वाढली आहे. 14 लाखांपर्यंत मर्यादित असलेली लोकसंख्या सध्या 22 लाखांपर्यंत गेली आहे. त्यामुळे नागरी सुविधा पुरवण्यामध्ये महापालिका मनुष्यबळ नसल्याचे कारण दिले जाते.

    तांत्रिक संवर्गानुसार परिक्षेचे स्वरूप तयार केले असून, आयुक्तांच्या मान्यतेनंतर टीसीएसला पाठवले जाणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये साधारणतः मंजूर पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. भरतीप्रकरणी अद्यापही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे. नाशिकच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर वाढत्या लोकसंख्येचा प्रभाव पडत आहे.

    सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर भार

    मनपाकडे कमी मनुष्यबळ असल्याने सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा नेहमीच चर्चिला येत असतो. कोविड काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर निर्माण झालेला भार लक्षात घेता तांत्रिक व अंतांत्रिक संवर्गातील पदभरती कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर करण्यात आली होती. मात्र, या कर्मचान्यांना वेळेवर मानधन अदा करणे, तसेच विहित कालावधीसाठी करारबद्ध न करणे अशा स्वरूपाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचे आरोग्य प्रभावित झाले.