दोन दिवसांत ‘आनंदाचा शिधा’ द्या, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

शिधा पत्रिकाधारकांना दाेन दिवसांत ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला नाही तर शुक्रवारी अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा काॅंग्रेसने दिला आहे.

    पुणे : शिधा पत्रिकाधारकांना दाेन दिवसांत ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला नाही तर शुक्रवारी अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा काॅंग्रेसने दिला आहे. राज्य सरकारने शिधा पत्रिकाधारकांना दिवाळीसाठी ‘आनंदाचा शिधा’ देण्याचे जाहीर केले हाेते. दिवाळी २ ते ३ दिवसांवर आली असताना अद्यापही ताे मिळत नाही. याच्याविराेधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अन्न धान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांना निवेदन देण्यात आले.

    शासनाने अध्यादेश काढल्यानंतरही आनंदाच्या शिध्यामध्ये काही वस्तू कमी का केल्या ? असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. तसेच येत्या शुक्रवारच्या आत जर संपूर्ण पुणे शहरातील रेशन दुकानदारांना गोर – गरीब नागरिकांना वाटण्यासाठी आनंदाचा शिधा वितरीत झाला नाही तर अन्न – धान्य कार्यालयाला शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने घेराव घालण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

    यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, माजी आमदार दिप्ती चवधरी, अजित दरेकर, लता राजगुरू, सुजित यादव, राजेंद्र भुतडा, हनुमंत पवार, मुन्ना खंडेलवाल, ब्लॉक अध्यक्ष आसिफ शेख, रमेश सोनकांबळे, राजू ठोंबरे, हेमंत राजभोज, अक्षय माने, विशाल जाधव, संतोष पाटोळे, समीर शेख, दत्ता जाधव, भरत सुराणा आदी उपस्थित हाेते.