10 दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर…; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

आरक्षणसाह कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. आज आंतरवाली सराटी येथे भव्य सभेचे आयोजन केले. या विराट सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा एल्गार करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 

    जालना : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहे. आरक्षणसाह कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. आज आंतरवाली सराटी येथे भव्य सभेचे आयोजन केले. या विराट सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा एल्गार करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
    जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
    “आजचा दिवस हा मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज घराघरातला मराठा आयुष्यभर छातीवर हात ठेवून या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार होतो, हे सांगेल, घराघरातील मराठा आरक्षणासाठी पेटून उठला आहे, असे म्हणत सरकारला उरलेल्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा,” अशी मागणी सरकारकडे केली.
    मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मराठा समाजाची भावना सरकारला समजत नसेल तर ती त्यांची समस्या आहे. आमचे आंदोलन शांततेत होईल. त्यात कोणताही बदल होणार नाही. पण सरकारला आरक्षण द्यावेच लागेल. पुढील 10 दिवसांत आम्हाला आरक्षण मिळाले नाही तरी आमच्याकडून शांततेचा भंग होणार नाही. सरकारने आरक्षण दिले नाही तर आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असे ते म्हणाले. मी आज मराठा समाजापुढे आरक्षणासंबंधीची वस्तुस्थिती मांडणार आहे. मराठा समाज आज शांत आहे. मायबाप मराठा समाजावर माझा विश्वास आहे. शांततेत आंदोलन केल्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आम्ही काहीही झाले तरी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
    लाठीचार्जनंतर राज्याचे लक्ष वेधले
    मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरु केले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी होती. तीन दिवस त्यांच्या उपोषणाकडे राज्याचे लक्ष गेले नाही. परंतु १ सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. यावेळी प्रचंड गोंधळ झाला. त्यावेळी लाठीचार्ज पोलिसांनी केला. अनेक जण जखमी झाले आणि राज्याचे लक्ष मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सभा घेतल्या. या सभानंतर १४ सप्टेंबर रोजी अंतरवली सराटीत सभेचं आयोजन केले.