मुस्लिमांना आरक्षण द्या! आर्टी, मार्टीची स्थापना करा ; आमदार कैलास पाटील यांची विधीमंडळ अधिवेशनात मागणी

अल्पसंख्यांक आणि मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्टी, आर्टी  सारख्या संस्थाची स्थापना सरकारने करावी. तसेच मुस्लिम समाजातील मागास जातींना पुन्हा आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली आहे.

    धाराशिव  : अल्पसंख्यांक आणि मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्टी, आर्टी  सारख्या संस्थाची स्थापना सरकारने करावी. तसेच मुस्लिम समाजातील मागास जातींना पुन्हा आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली आहे.

    अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक, सामाजिक मागासलेपण दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बार्टी, सारथी,  महाज्योतीसारख्या संस्थेची गरज आहे. समाजाकडून होत असलेल्या मागणीनुसार या विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद संशोधन,  प्रशिक्षण संस्थेची (मार्टी) स्थापना करण्यात यावी. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारच्या काळात मुस्लिम समाजातील ५० मागासलेल्या जातींना आरक्षण लागू केले होते. मात्र पुढच्या सरकारने त्याचे रूपांतर कायद्यात न केल्याने ते टिकले नाही. हे आरक्षण पुन्हा बहाल करण्यात यावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली व मातंग समाजाकडून होत असलेल्या मागणीनुसार या समाजातील विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे संशोधन,  प्रशिक्षण संस्थेची (आर्टी)  स्थापना करण्यात यावी. जेणेकरून या समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात येण्यास मोठा हातभार लागेल व त्यांना न्याय मिळेल. अशी मागणी देखील आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात सोमवारी चर्चेदरम्यान केली आहे.