वेताळेश्वर पॉईंटला प्रेक्षणीय स्थळाचा दर्जा द्या

रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान मध्ये ३८ अधिकृत पॉईंट्स असून दोन तलावांचा समावेश आहे.

    माथेरान : रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान मध्ये ३८ अधिकृत पॉईंट्स असून दोन तलावांचा समावेश आहे. यातील काही पॉईंट्स हे महत्वाचे असून शारलोट तलाव पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. मात्र माथेरान मध्ये ब्रिटिशकाळापासून असलेला वेताळेश्वर परिसर आजूनही उपेक्षित असून हा परिसर प्रेक्षणीय स्थळांमध्ये समावेश करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
    मुंबई-पुण्याला जोडणारा रायगड जिल्ह्यातील माथेरान हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. लाखो पर्यटकांची मांदियाळी येथे पहावयास मिळते. कोरोना नंतर हळहळू हे पर्यटनस्थळ उभारी घेत आहे. पर्यटकाना हिरव्यागार वनराईतुन लालमातीच्या रस्त्यामधून फिरण्याचा आनंद फक्त येथेच येतो. काही पॉईंट्स अतिशय विलोभनीय आहेत, पण ब्रिटिशकाळातील असलेला वेताळेश्वर पॉईंट हा पर्यटकांसाठी अजूनही उपेक्षित असून वेगवेगळ्या पैलूंनी परिपूर्ण आहे.

    अमन लॉज पॉईंट पासून अर्ध्या तासावर

    माथेरान शहराच्या उत्तरेला असलेला हा पॉईंट अतिशय मनमोहक आहे. ब्रिटिशकाळात या पॉइंटवर जाण्यासाठी काळ्या दगडांचा रस्ता अजूनही त्याकाळचा पुरावा देतो. अमन लॉज पॉईंट पासून अर्ध्या तासावर हा पॉईंट स्थित आहे. बालोध्यानातून मार्गक्रम करत घनदाट जंगलातून वेताळेश्वर मंदिराकडे आणि मंदिराकडून काळ्या कातळावरून पॉईंटकडे जातो. ब्रिटिशकाळापासून असलेला हा भाग आणूनही उपेक्षित आहे. नगरपालिकेकडून या पॉइंटला पुनर्जीवित करायला हवे, असे नागरिकांकडून बोलले जात आहे, पण अजुनही या पॉईंटकडे नगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.

    पॉईंटवरून काय पाहू शकतो?

    माथेरान शहराच्या उत्तरेला प्राईड ऑफ माथेरान म्हणून ओळखला जाणारा पॅनोरमा पॉईंट या पॉइंटच्या मार्गाखालील बाजूस असलेला वेताळेश्वर पॉईंट. ज्वालामुखी निर्मित काळ्या कातळावर असलेला पॉईंट असून पॉइंटच्या उजवीकडे चंदेरी, मंदेरी, टोपला आणि हाजी मलंगचा डोंगर, मधोमध धोदानी धरणं, चित्रपट शूटिंगचा भाग, पनवेलचा काही भाग, ड्रीमलँड फिल्मसिटी, तळोजा इंडस्ट्रीयल एरिया, तर डावीकडे हार्ट पॉइंटचा भाग दिसतो.

    …तर माथेरानच्या पर्यटनात वाढ

    पूर्ण माथेरान फिरण्यासाठी तब्बल तीन ते चार दिवस लागतात. त्याचप्रमाणे वेताळेश्वर पॉईंट पाहायचा असेल तर पर्यटकांचा पूर्ण दिवस जाऊ शकतो. यामध्ये वेताळेश्वर पॉईंट मार्गावर वन विभागाच्या बालोध्यानात एक दोन तास काढल्यानंतर त्याच मार्गाने जंगलातून मार्गक्रम करत जंगलसफरीचा आनंद घेत वेताळेश्वर मंदिर, बारमाही वाहणाऱ्या झऱ्यामुळे आणि गर्द वनराईमुळे येथे काही काळ विश्रांती घेऊन वेताळेश्वर पॉईंटकडे जाऊ शकतो. यासाठी पर्यटकाना एक दिवस हा भाग पाहण्यास जाईल. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांचा एक दिवस आणखी वाढू शकतो.

    रोजगार निर्मिती होऊ शकते

    माथेरानच्या उत्तर भागात खूप काही प्रेक्षणीय स्थळे नाहीत. त्यामुळे या प्रेक्षणीय स्थळाला खूप महत्व प्राप्त होऊ शकते. माथेरान शहरापासून तीन ते चार किलोमीटर लांब हा पॉईंट असल्याने जर पर्यटनासाठी पॉईंट खुला झाला, तर गाईड, नगरपालिकेमार्फत खाद्यान्न गृह, माहिती केंद्र उभारली, तर माथेरानमधील तरुणांना रोजगार निर्मिती होऊ शकते.

    पॉइंटचे खास वैशिष्ट्य

    वेताळेश्वर पॉईंट हा इतर पॉईंटपेक्षा वेगळा असून या पॉईंटवरील बारमाही जलस्रोत वाहत असतो. डोंगरावरून पडणारे झऱ्याचे पाणी डोंगरकाठावरून खाली जाते तेच पाणी हवेच्या दाबाने तुषार बनून आपल्या अंगावर येते तसेच काही लाल दगडावर जुनी शिल्प सुद्धा पहावयास मिळतील. ही खास वैशिष्ट्य याच पॉइंटवर पहावयास मिळतात.
    माथेरानचा विलोभनीय पॉईंटमध्ये वेताळेश्वर पॉईंटचा समावेश होऊ शकतो. या मार्गात गार्डन, जंगल सफर, मंदिर, नैसर्गिक जलस्रोत आणि पॉईंट येतात त्यामुळे एका मार्गात पाच प्रेक्षणीय भाग पाहवयास मिळू शकतात हे सर्व नगरपालिकेच्या सकारात्मकतेने शक्य होऊ शकते. नगरपालिकेला फक्त रस्ता आणि सुरक्षिततेसाठी पॉईंटवर कठडा इतके जरी तयार केले तरी हा पॉईंट सदा गजबजलेला होऊ शकतो. या पॉइंटसाठी नगरपालिकेने प्रेक्षणीय स्थळाचा दर्जा देऊन माथेरानचे पर्यटन वाढवावे.
    -केतन रामाणे, उपाध्यक्ष, कोकणवासीय समाज