“नको असेल ते द्या, हवे असेल ते घ्या”, बेलापूर विभाग कार्यालयाचा उपक्रम ठरतोय आकर्षण; संपूर्ण शहरात राबवण्याची गरज

नवी मुंबई महापालिका कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी सातय्याने नागरिकांना आवाहन करत आहे. शहरात विविध उपक्रम राबवत आहे. सोसायटी अंतर्गत खत प्रकल्प राबवण्यास सांगितले जात आहे. त्यासह पालिकेकडून ई कचरा संकलन देखील केले जात आहे. तर प्लास्टिक कचऱ्यात न टाकता त्याचे संकलन करून त्यापासून विविध वस्तू  बनवण्यासाठी सामाजिक संस्थांना प्रोत्साहित केले जात आहे.

  सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेकडून (NMMC) स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत (Swachh Survekshan ) विविध कल्पना लढवल्या जात आहेत. शहर सुशोभीकरणात नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा असल्याचे सातत्याने आयुक्तांकडून सांगण्यात येत आहे. पालिकेकडून शून्य कचऱ्याची मोहीम (Zero Waste Campaign) आखण्यात आली आहे.

  नागरिकांकडून अनेकदा रोजच्या सुक्या व ओल्या कचऱ्यासोबत  जुन्या वस्तू देखील अनेक असतात. त्या वस्तू अनेकदा कचऱ्यात टाकण्यात येतात. सुस्थितीतील वस्तू निव्वळ जुन्या झालेल्या असतात या कारणास्तव कचऱ्यात टाकल्या जात असतात. मात्र नियमित कचऱ्यातील हा जुन्या वस्तूंचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई पालिका सरसावली आहे. यासाठी नको असेल ते दया, हवे असेल ते घ्या अशी संकल्पना आणली आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.

  नवी मुंबई महापालिका कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी सातय्याने नागरिकांना आवाहन करत आहे. शहरात विविध उपक्रम राबवत आहे. सोसायटी अंतर्गत खत प्रकल्प राबवण्यास सांगितले जात आहे. त्यासह पालिकेकडून ई कचरा संकलन देखील केले जात आहे. तर प्लास्टिक कचऱ्यात न टाकता त्याचे संकलन करून त्यापासून विविध वस्तू  बनवण्यासाठी सामाजिक संस्थांना प्रोत्साहित केले जात आहे. यात आता  बेलापूर विभागाने सुरू केलेली “नको असेल ते द्या, हवे असेल ते द्या” हा मानवतेच्या दृष्टीकोनातून सुरु केलेल्या उपक्रमांतून अनेक उद्दिष्ट्ये साध्य होत आहेत.

  नवी मुंबई महानगरपालिकेने असे स्टँड अनेक ठिकाणी उभे केले आहेत. आपल्याला उपयोगी नसलेले कपडे, चपला, पुस्तके, भांडी, खेळणी इ. वस्तू कचऱ्यात किंवा भंगारात देण्यापेक्षा इथे ठेवल्यास नक्कीच कुणाच्यातरी उपयोगी पडतील. ज्यांना ह्या वस्तू उपयोगी असतील त्या वापरा. लोकांचे पॆसे वाचतील, गरीबांना मदत होणार आहे. यामुळे सुक्या कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून;  वस्तू पुन्हा वापरली जाणार असल्याने वस्तू बनविण्याकरिता लागणाऱ्या सामानाचा वापर कमी होऊन; प्रदूषण कमी होण्यास व निसर्गाचे संवर्धन होण्यास देखील मदत होणार आहे. तसेच गरजवंतांच्या हातात या वस्तू जाणार असल्याने असंख्य गरजू नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अनेक स्वप्नांची पूर्तता करण्यास कारणीभूत ठरणार आहे.

  अनेक सोसायट्यांकडून मागणी

  पालिकेकडून राबवला जाणार हा उपक्रम पाहून अनेक सोसायट्यांनी पालिकेकडे या स्टॅण्डविषयी विचारणा केली आहे. आम्ही याची काळजी घेऊ व नागरिकांना आवाहन करून असे देखील नागरिक सांगत आहेत. त्यामुळे कमी वेळेत नागरिकांच्या पसंतीस उतरलेला हा उपक्रम संपूर्ण शहरात राबविल्यास पालिकेला फायदा होणार आहे. त्यामुळे आयुक्त बांगर यांच्याकडून केले जाणारे स्वच्छतेसाठी लोकसहभागाचे आवाहन काहीअंशी यशस्वी होण्यास हा उपक्रम हातभार लावणार आहे.

  डॉ. मिताली संचेती यांची संकल्पना

  मानवतेची भिंत उपक्रम अनेक शहरांत राबवला जात आहे.मात्र कपडे व चपलांव्यतिरिक्त अनेक वस्तू कचऱ्यात टाकल्या जातात. त्यापेक्षा या सर्व वस्तू नागरिकांना एकाच ठिकाणी ठेवण्यास मिळल्या तर. असा विचार मनात आल्याने ही संकल्पना राबवली. त्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांकडून या वस्तू ठेवल्या जात आहेत.

  तर अनेक गरजू या वस्तू घेऊन जात आहेत. अनेक विद्यार्थी स्टॅण्डवर ठेवलेली पुस्तके घेऊन जाताना दिसून येत आहेत. त्यामुळे ही संकल्पना यशस्वी ठरत असल्याचे म्हणता येईल. सध्या तीन वॉर्डात हे स्टॅण्ड ठेवले आहेत. बेलापूर विभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या १४ वॉर्डात हेस स्टॅण्ड ठेवण्यात येणार आहेत.

  तसेच या वस्तू रात्रीच्या वेळेस सुरक्षित राहण्यासाठी ते दररोज घेऊन जाण्यासाठी व पुन्हा आणून ठेवण्यासाठी किंवा सामाजिक संस्थांना या वस्तू देता येईल का यासाठी आम्ही प्रयत्नांत आहोत. जेणेकरून योग्य व गरजवंतांच्या हातात या वस्तू पडतील व त्याचा वापर होऊन काही प्रमाणात कचरा कमी होईल.

  – डॉ.मिताली संचेती, सहाय्यक आयुक्त, बेलापूर विभाग कार्यालय

  कशी आहे कल्पना ?

  # बेलापूर विभागातील बेलापूर, सीबीडी व सीवूड भागातील १४ वॉर्डमध्ये हवं स्टॅण्ड ठेवण्यात येणार आहेत.
  # सध्या प्रायोगिक तत्वावर तीन ठिकाणी हे स्टॅण्ड ठेवण्यात आले आहेत.
  # एकाच जागेवर अनेक वस्तू नागरिकांना ठेवता येतात.
  # याआधी शहरात मानवतेची भिंत म्हणून कपडे व बूट, चपला ठेवल्या जात होत्या.
  # मात्र या व्यतिरिक्त अनेक गोष्टी असतात, मात्र जुन्या झाल्याने त्या कचऱ्यात टाकल्या जातात.
  # त्यासाठी एक दूध केंद्र किंवा त्यापेक्षा थोडा मोठा स्टॅण्ड ठेवला गेला आहे.
  # यात कपडे, चादर, शैक्षणिक साहित्य म्हणजे पुस्तके किंवा इतर बाबी, बूट चपला, स्वयंपाक घरातील जुनी भांडी व वस्तू, खेळणी किंवा घरातील अनेक इतर गोष्टी ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे तयार केले आहेत.
  # गर्दीच्या ठिकाणी व रहिवाशी भागापासून जवळ हे स्टॅण्ड ठेवण्यात आले आहेत.