Solapur ZP
Solapur ZP

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आलेली 36 कोटींच्या कामांमधील आक्षेप घेतलेले बंकलगीचे टेंडर रद्द करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी दिली.

    सोलापूर : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आलेली 36 कोटींच्या कामांमधील आक्षेप घेतलेले बंकलगीचे टेंडर रद्द करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी दिली. तर माहितीच्या अधिकारात जलजीवनच्या टेंडरबद्दल माहिती मिळाली असून ठराविक ठेकेदारांना कामे देण्यात आल्याचे दिसून येत असल्याने याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे लोकशासन आंदोलन पार्टीचे अध्यक्ष राजू दिंडोरे यांनी म्हटले आहे.

    झेडपीच्या पाणीपुरवठा विभागातर्फे जानेवारी ते जून या काळात केंद्र शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेच्या ९४० कामांचे टेंडर मंजूर करण्यात आले. सुमारे ३६ कोटी खर्चाची १५० कामांचे टेंडर काढण्यात आले होते. यातील १३६ कामाचे टेंडर फायनल करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी टेंडर मंजूर करताना मंद्रूपच्या आर के कंट्रक्शनलाच २५ कोटी ६२ लाख २२ हजार रुपयांची ३२ कामे मंजूर केली आहेत. तसेच निम्बर्गीच्या सूर्यकांत बिराजदार यांना सात कोटी ९५ लाख ७९ हजाराची दहा कामे मंजूर केली आहेत. तसेच श्रीराम कन्स्ट्रक्शन ला सुमारे तीन कोटीची कामे मंजूर केली आहेत. माहितीच्या अधिकारात मंजूर कामाची अधिकृत यादी घेण्यात आल्याचे लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोरे यांनी सांगितले. एकाच ठेकेदारांना अनेक कामे मंजूर करण्यात आल्याने संशय बळावला आहे. त्यामुळे आम्ही याबाबत आता न्यायालयात धाव घेणार आहोत असे ते म्हणाले.

    सर्व कामकाज नियमानुसार

    पाणीपुरवठा विभागाचे टेंडर मंजुरीचे कामकाज नियमानुसार झाले आहे. ज्या ठेकेदारावर जादा काम दिल्याचा आक्षेप आहे, त्या ठेकेदाराला शासन नियमानुसार पाचपट कामे देता येतात असे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी सांगितले. इतर कोणतीही कामे रद्द करण्यात येणार नाहीत फक्त बंकलगीचे टेंडर रद्द करण्यात येणार असल्याचे कोळी यांनी स्पष्ट केले.