गोवा मेड दारुची विक्री, तिघांना अटक; सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विट्यातील पथकाने केलेल्या कारवाईत तासगाव तालुक्यातील तिघा जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूसह सव्वा चार लाख रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    सांगली : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विट्यातील पथकाने केलेल्या कारवाईत तासगाव तालुक्यातील तिघा जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूसह सव्वा चार लाख रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विनोद विठ्ठल माने, (वय ३७ रा. माने वस्ती, येळावी), सुशांत अशोक गायकवाड (वय २७, रा. गायकवाड मळा, बस्त वडे) आणि गणेश मालोजी शिंदे (वय २४, रा. दहिवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    सांगली जिल्ह्यातील सावळज (ता. तासगाव) येथे डोंगरसोनी रस्त्यालगत हॉटेल फिनिक्स नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये, किचन भट्टीला लागून भूमिगत पाण्याच्या टाकीत बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या बाटल्या लपविल्या आहेत. शिवाय तेथे गोवा बनावटीची दारू विदेशी दारूच्या बाटल्यांत भरून हॉटेल फिनिक्समध्ये विक्री होत आहे, अशी माहिती सांगलीचे उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे आणि निरीक्षक विजय मनाळे यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री निरीक्षक विजय मनाळे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूरचे निरीक्षक प्रशांत रासकर, तासगावचे दुय्यम निरीक्षक सुनील पाटील, विट्याच्या दुय्यम निरीक्षक माधवी गडदरे, दिलीप सानप, उदय पुजारी, जवान सचिन सावंत, प्रमोद सुतार, रणधीर पाटील, अमित पाटील, वाहनचालक अर्जुन कोरवी यांच्या पथकाने सावळज येथे जाऊन संबंधित ठिकाणी छापा टाकला.

    यावेळी विनोद माने सुशांत गायकवाड आणि गणेश शिंदे बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विदेशी बाटल्यांमध्ये घालून बुच पॅक करत असताना रंगेहात सापडले. या तिघांनाही राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने अटक केली. राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, सहआयुक्त सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

    असा आढळला साठा

    छाप्यात गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या १८० मिलीच्या ८९४ बाटल्या, ७५० मिलीच्या १५०, बॉटलिंग उपकरण, २० हजार १९१ बॉटलची बनावट बुचे, महाराष्ट्र राज्यात विक्री साठीच्या (गोवा दारू भरण्यासाठी वापरण्याकरिता) ७२ रिकाम्या बाटल्या, २ स्टीलचे जग, २ प्लास्टिक कॅन, ३ प्लास्टिक गाळणी, डीव्हीआर २ मोबाईल असा एकूण ४ लाख २४ हजार ८१५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.