गोल्डमॅन पंकज पारख यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक; सहकार क्षेत्रात खळबळ, जाणून घ्या काय आहे प्रकरण…

येवला येथील कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज पारख यांना गुरुवारी (दि.२) २२ कोटींचा अपहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरात एका फ्लॅटमध्ये ही कारवाई केली.  

  पंचवटी : येवला येथील पतसंस्थेत जवळपास २२ कोटींचा अपहार केल्याप्रकरणी (Fraud of Rs. 22 Crores) पतसंस्थेचे अध्यक्ष आणि येवला नगर परिषदेचे (Yeola Nagar Parishad) माजी नगराध्यक्ष पंकज पारख (Goldman Pankaj Parakh) यांच्या विरोधात ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील एका फ्लॅटमध्ये कारवाई करीत अटक केल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येवला येथील कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज पारख यांना गुरुवारी (दि.२) २२ कोटींचा अपहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरात एका फ्लॅटमध्ये ही कारवाई केली.

  अध्यक्ष पंकज पारख, व्यवस्थापक योगेश सोनी, अजय जैन आणि संचालक मंडळाच्या विरोधात सहायक निबंधक प्रताप पाडवी यांनी २१ कोटी ९६ लाख ९९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा पुढील तपास ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

  पोलिसांकडून तपास सुरु

  याबाबत पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांना विचारले असता त्यांनी पंकज पवार यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती देत पुढील तपास सुरु असल्याने आत्ताच माहिती देणे उचित होणार नसल्याचे सांगितले.

  पारख यांच्या अटकेमुळे सहकार क्षेत्रात खळबळ

  पारख यांच्या अटकेमुळे सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी गोल्डमॅन म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता. सोन्याचा शर्ट तयार करून परिधान केल्याने त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आल्याने पंकज पारख चांगलेच चर्चेत आले होते.