Gondia - Ballarshah passenger gets green flag, second passenger to run from April 5, citizens get relief

रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेत, गोंदिया स्थानकावरून सांयकाळी पाच वाजता सुटणाऱ्या गोंदिया - बल्लारशाह या पॅसेंजर रेल्वेगाडीला हिरवी झेंडी देण्यात आली आहे. या अनुषंगाने आता ५ एप्रिलपासून गोंदिया - नागभीड - बल्लारशाह ही नवीन पॅसेंजर सुरू होणार आहे.

    गोंदिया : गोंदिया – बल्लारशाह मार्गावर चालणाऱ्या पॅसेंजर कोरोनाकाळात बंद झाल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील अनेक गावातील प्रवाशांची हेळसांड होत होती. रेल्वे प्रशासनाकडून काही महिन्यांपूर्वी एक मेमू पॅसेंजर सुरू झाली होती. मात्र, ही सेवा पुरेशी नसल्याने या मार्गावरील रेल्वेसेवा पूर्ववत करण्याची मागणी होत असताना आता ५ एप्रिलपासून गोंदिया – बल्लारशाह पॅसेंजर सुरू केली जाणार असल्याचे पत्र दक्षिण – पूर्व मध्य रेल्वेच्या मंडळ प्रबंधकांकडून देण्यात आले आहे.

    गोंदिया – बल्लारशाह रेल्वेमार्गावर यापूर्वी धावत असलेल्या पॅसेंजर अनेक गावातील प्रवाशांसाठी वेळ आणि पैशाची बचत करणाऱ्या होत्या. परंतु, कोरोनाकाळात गर्दी टाळण्यासाठी रेल्वे विभागाने सर्वच पॅसेंजर गाड्या बंद केल्या. नंतरच्या काळात सुपरफास्ट ट्रेन सुरू केल्या असल्या तरी पॅसेंजर गाड्यांना हिरवी झेंडी देण्यात आली नव्हती. परंतु, गोंदिया – बल्लारशाह या मार्गावरील रोजच्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता काही महिन्यांपूर्वी केवळ एक मेमू ट्रेन सुरू करण्यात आली होती. पॅसेंजरच्या माध्यमातून रोज हजारो नागरिक आणि कर्मचारी प्रवास करीत असून, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे आवागमन या पॅसेंजरच्या माध्यमातून होत होते. मात्र, केवळ एक मेमू ट्रेन सुरू झाल्याने नागरिकांना पुरेशी सुविधा मिळत नव्हती. तर त्यांना जास्त पैसा खर्च करून इतर वाहनांनी प्रवास करावा लागत होता. 

    त्यामुळे या मार्गावरील रेल्वेसेवा पुर्ववत सुरू करण्याची मागणी होत होती. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेत, गोंदिया स्थानकावरून सांयकाळी पाच वाजता सुटणाऱ्या गोंदिया – बल्लारशाह या पॅसेंजर रेल्वेगाडीला हिरवी झेंडी देण्यात आली आहे. या अनुषंगाने आता ५ एप्रिलपासून गोंदिया – नागभीड – बल्लारशाह ही नवीन पॅसेंजर सुरू होणार आहे. त्यामुळे, या मार्गावर दोन पॅसेंजर धावणार असल्याने हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.