काम सांगून मत मागायचे दिवस गेले, शिरुरची जनता शांत बसणार नाही; जयंत पाटलांची टीका

लोकसभा निवडणुकीचा धुराळा लवकरच उडणार आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांचा जोरदार प्रचार सध्या सगळीकडे सुरु आहे. महायुतीकडून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार सगळीकडे सुरु आहे.

  लोकसभा निवडणुकीचा धुराळा लवकरच उडणार आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांचा जोरदार प्रचार सध्या सगळीकडे सुरु आहे. महायुतीकडून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार सगळीकडे सुरु आहे. शिरुर लोकसभेचे (Shirur Loksabha election ) महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांची जाहीर सभा बोलवण्यात आली होती. या सभेला जयंत पाटील हे देखील उपस्थित होते.सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

  जयंत पाटील म्हणाले, देशामध्य मत मागायच्या पद्धती बदलल्या आहेत. काम सांगून मत मागायचे दिवस गेले आता, कारण भाजप एक काम सांगत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका सभेत बोलताना म्हणाले होते, कोरोना काळात नरेंद्र मोदी यांनी लस काढली. या लसीमुळे अनेक लोकांचे प्राण वाचले. म्हणून कोरोना लसीकडे पाहून मोदींना मत द्या. आता त्यांनी लस काढली, आपले प्राण वाचले म्हणून मते यांना द्या तर मग हाच फॉर्मुला असेल तर काँग्रेस पक्षाने पूर्वी पूर्वी पोलीओची लस काढलेली आहे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मत दिले पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.

  देशात पुन्हा महागाई वाढेल; जयंत पाटील

  देशामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर, १८% वरून जीएसटी २१% वर जाईल. पेट्रोलची किंमत १०५ वरून ११५ होईल. तर डिझेलची किंमत ११० वर जाईल. गॅस सिलेंडरची किंमत १५०० रुपयांवर जाईल. भारतावर २१० लाख कोटी रुपयांचं कर्ज करून ठेवलं आहे हे २१० लाख कोटी कर्ज फेडण्यासाठी याच्याशिवाय यांना दुसरा पर्याय नाही. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर करायचे, असे आव्हान जयंत पाटील यांनी जनतेला केलं आहे.

  शिरुरची जनता शांत बसणार नाही – अमोल कोल्हे

  प्रचार सभेत अमोल अमोल कोल्हे यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. अमोल कोल्हे म्हणाले, तुमच्या सांगण्यावरून भूमिका बदलेली नाही. आम्ही आमच्या स्वाभिमान गहाण टाकलेला नाही. शिरूरच्या जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. समोर पराभव दिसायला लागल्यानंतर इतक्या मोठ्या पदावरचा माणूस कसा काय गडबडतो, हेच गावागावात जाऊन विचारत आहेत, तुमच्या गावात खासदाराने निधी दिला का? पण आज त्यांनीच उत्तर दिले आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.