शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिवाळी अधिवेशन संपण्याआधी विशेष पॅकेज जाहीर होणार; अजित पवार यांची माहिती

सर्व शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशन संपण्याआधी गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

    नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ आणि अवकाळी असा दोन्हीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठं नुकसान झाले असून सरकारकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे. या सर्व शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशन संपण्याआधी गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी विशेष पॅकेजची घोषणा करतील. महायुती सरकारचं तसं नियोजन आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची आहे. विशेष पॅकेजची घोषणा झाल्यानंतर सर्वांना हे दिसेलच, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं.

    राज्यात काही ठिकाणी पंचनामे राहिले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आणि नंतर मुख्य सचिवांना देखील सूचना केल्या आहेत. काम पूर्ण करण्यासाठी त्यांना ठराविक वेळ दिला आहे. त्यानंतर पंचनाम्याचे आकडे जिल्हाधिकारी आणि त्यानंतर विभागिय आयुक्तांकडून आमच्यापर्यंत येतील. अशारितीने सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा हेतू आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

    दिलगिरी व्यक्त करून विषय संपवतो – पवार

    “माझे विरोधक त्या गोष्टीचा बाऊ करण्याचा प्रयत्न करणारच. त्यात काही आकाश-पाताळ एक झालेलं नाहीये. त्यात कुठला अपशब्द होता असंही नाहीये. माझ्यादृष्टीने मी तो विषय संपवलेला आहे. पण माझ्या विरोधकांना काही ना काही मुद्दा हवाच असतो. अधिवेशन चालू झाल्यानंतर त्या विषयाला इतकं वर नेण्याचा प्रयत्न केला, की त्यावर न बोललेलंच बरं. मला त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही. आपली परंपरा आहे. एखादा शब्द वेगळा गेला, तर आपण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि विषय संपवतो”, असं अजित पवार म्हणाले.